नंदुरबारमध्ये दोन गटांत दंगल; परस्परांवर तलवारीसह इतर हत्यारांनी वार; जाळपोळ; सोशल मीडियातील पोस्ट ठरले कारण; ३५ जणांवर गुन्हा; १० ताब्यात
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सोशल मीडियात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून दोन गटांत दंगल उसळल्याची घटना नंदुरबार शहरातील गौतमनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली. यात दोन्ही गटांकडून परस्परांवर हल्ल्यासाठी तलवारी, गुप्ती आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीला रात्री ९ वाजेच्या सुमारास संजय विष्णू रगडे आणि बिरजू ऊर्फ विजय नरेश म्हस्के या दोन तरुणांमध्ये गौतमनगर भागात वाद झाला. सोशल मीडियात टाकलेली पोस्ट हे या वादाचे कारण होते. प्रारंभी सुरू असलेल्या शाब्दिक वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी दोन्ही बाजूंनी काही तरुण समोरासमोर आले आणि परस्परांशी भिडले. दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या, तलवारी, गुप्ती यांचा वापर परस्परांवर हल्ल्यासाठी झाला.
याचदरम्यान विजय म्हस्के याच्या मालकीच्या एमएच ३९ एएम ८८८६ या दुचाकीला जमावातील काहींनी आग लावली. यात ही गाडी भस्मसात झाली. या गाडीच्या डिकीत १७ हजार रुपयांची रोकड आणि आयकर भरणा संदर्भातील कागदपत्रे होती. तीही या आगीत जळाली. हाणामारीदरम्यान दोन्ही गटातील लोक हाती असलेल्या शस्रांसह परस्परांवर धावून जात होते. यामुळे तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. यातील काहींनी तातडीने या प्रकाराबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दंगल आटोक्यात आणली.
परस्परांविरोधात तक्रारी
घडलेल्या प्रकाराबाबत सुरूवातीला संजय रगडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून विजय नरेश म्हस्के, कल्पेश झायचढ, आकाश फाळके, दीपक बागले, पुनीत, सुभाष डबडे, गोलू भैया, विराज काशी, आनंद, बाला, सोनू शिरसाठ, अमर वळवी, गोरख संजय बाशिंगे, निरंजन फाळके, दीपक पेंढारकर, रावण दाढीवाला, बंटी हेमंत तवर, आनंदा काशिनाथ साळवे यांच्यासह इतरांवर बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी विजय म्हस्के यांच्या तक्रारीवरून संजय रगडे, रवी रगडे, बब्बू पगारे, रोहित भालेराव, रुपेश कांबळे, प्रथमेश पगारे, दीपक भालेराव, विजय पगारे, उमेश पगारे, विशाल रामराजे, योगेश भालेराव, कृष्णा भालेराव (सर्व रा. नंदुरबार) यांच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमवून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा जण ताब्यात, पोलीस कोठडीत रवानगी
दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या तक्रारीनंतर नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत गुन्हा दाखल करून दहा जणांना ताब्यात घेतले. नंतर या सर्वांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांची २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्यात येत असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करीत आहेत.



