पळा, पळा, गावात मुले पळवणारी टोळी आली, चौघांना पळवले…शहादा तालुक्यातील वडाळीत सारेच हादरले; पण निघाली अफवा; नेमके काय घडले, वाचा…
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गावात लहान शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आली असून, आतापर्यंत या टोळीने चार मुलांना पळवून नेले आहे, अशा चर्चेने शहादा तालुक्यातील वडाळी गावात गुरुवारी जोरदार गोंधळ माजवला. ही चर्चा सुरू असेपर्यंत शाळेतील शिक्षकांना घरोघरी जाऊन समजावणी करण्याची आणि पोलीस पाटलांना सोशल मीडियावरून समजूत काढण्याची कसरत करावी लागली. अर्थात, नंतर ही चर्चा निव्वळ अफवा निघाली आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
वडाळी गावातील जिल्हा परिषद शाळा गुरुवारी (दि. २६) सकाळी नेहमीप्रमाणे भरली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत येण्यास सुरूवात झाली. मात्र, याच दरम्यान गावकऱ्यांमध्ये गावात शाळकरी मुले पळवून नेणारी टोळी आल्याची चर्चा सुरु झाली. एवढेच नव्हे तर या टोळीने आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांना पळवून नेले, इथपर्यंत ही चर्चा पोहोचली. यामुळे सारेच घाबरून गेले. आपल्या पाल्यांना शाळेत सोडविण्यासाठी निघालेल्या पालकांनी अर्ध्या रस्त्यातूनच पाल्यांना घरी नेण्यास सुरूवात केली. तर ज्यांची मुले आधीच शाळेत पोहोचली होती, त्या पालकांनी शाळेत धाव घेत मुलांना घरी घेऊन जाण्यास सुरूवात केली.
या साऱ्यामुळे शाळेतील शिक्षक देखील गोंधळून गेले. त्यांनी तातडीने या चर्चेची शहानिशा करण्याच्या उद्देशाने तातडीने पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांच्याशी संपर्क साधला आणि पालकांची समजूत काढण्याची गळ त्यांना घातली. गोसावी यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सोशल मीडियाचा आधार घेत ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचा मेसेज सर्वांना पाठवला. त्याचवेळी शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांची समजूत काढणे सुरु केले. ही चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे, अशी पालकांची समजूत काढण्यात शिक्षकांनी यश मिळविले. याचवेळी सुरेश भोई, महेंद्र मोहिते, मेघ गोसावी, वंदना गोसावी, वंदना पाटील या शिक्षकांनी पालकांना आपल्या मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. यानंतर गावातील अफवेचा बाजार उठला आणि वातावरण निवळले. दरम्यान, या अफवेच्या पार्श्वभूमीवर सहायक गटविकास अधिकारी विकास राठोड यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळा, वडाळीचे मुख्याध्यापक राजेंद्र साळवे यांनीही मुले पळविणारी टोळी गावात आली, ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट करून त्यावर विश्वास न ठेवता पालकांना आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठविण्याचे आवाहन केले आहे.



