नंदुरबार जिल्हा

शहादा बसस्थानक आहे की गुरांचा गोठा?; दुरावस्थेवर युवासेना-शिवसेना पदाधिकारी संतापले; वाहतूक नियंत्रकांना विचारला जाब

शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून, यापेक्षा जनावरांचा गोठा बरा असतो. लोकांना बसण्यासाठी नीट आसने नाहीत, पंखे नादुरुस्त आहेत, प्यायला पाणी नाही. याला बसस्थानक तरी कसे म्हणायचे. यापेक्षा जनावरांचा गोठा असतो, अशा शब्दांत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) युवासेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत वाहतूक नियंत्रकांना जाब विचारला. तसेच तत्काळ हा विषय मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
युवासेनाचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शहादा येथील बस स्थानक येथे प्रत्यक्ष भेट देत प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी बसस्थानकातील विविध समस्या जाणून घेत संपूर्ण परिसराची सखोल पाहणी करण्यात आली. यावेळी हिरकणी कक्षाची स्थिती, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, नादुरुस्त पंखे, पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता, बसेसची दुरवस्था, वेळापत्रकानुसार बसेस न सुटणे, चालकांकडून मोबाईल वापर, प्रवाशांशी असौजन्यपूर्ण वागणूक तसेच महिला सुरक्षेतील त्रुटी अशा अनेक बाबी निदर्शनास आल्या.
या सर्व मुद्द्यांवर वाहतूक नियंत्रक रफिक मिर्झा व विजय धनगर, वरिष्ठ लिपीक शरीफ पिंजारी आणि अकाउंट विभागातील उदय ठाकरे यांची भेट घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची ठोस मागणी करण्यात आली. विशेषतः महिला सुरक्षेबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने तात्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा आ. चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, युवासेना शहादा शहर प्रमुख सागर चौधरी, तसेच स्वप्निल पाटील, अर्जुन राजपुत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button