रिक्षा रांगेत लाव म्हणताच पेट्रोलपंप चालकाला नेले फरफटत; अंगावर रिक्षा पण उलटवली; शहाद्याजवळील पंपावरील थरार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा मोहिदा त.ह. दरा फाटा येथील पेट्रोल पंपचालकाला रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मोठा फटका सहन करावा लागला. पेट्रोल भरण्यासाठी रिक्षा रांगेत लावा, असे सांगताच कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या सहकाऱ्याने नंतर मध्यस्थी करणाऱ्या पंपचालकाला फरफटत नेट पुढे त्यांच्या अंगावर रिक्षा उलटवल्याचा थरारक प्रकार घडला. या घटनेत पंपचालक विजय सुभाष पाटील जखमी झाले असून, पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय पाटील हे दोन दिवसांपूर्वी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास आपल्या पेट्रोल पंपावर नियमितपणे काम करीत होते. याचवेळी एमएच ०४ एफयू ४३३० ही रिक्षा घेऊन चालक आला. त्याच्यासोबत आणखी एक सहकारी होता. त्यांनी पंपावरील रांगेत रिक्षा न लावता थेट सर्वांच्या पुढे आणली. यावर पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला रिक्षा रांगेत लावा, अशी सूचना केली. यावर त्या दोघांनीही तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली. हा वाद वाढल्याने आवाज ऐकून विजय पाटील तेथे आले. ते रिक्षाचालक व त्याचा सहकाऱ्याला जाब विचारत असतानाच त्या दोघांनी पाटील यांच्या अंगावर रिक्षा घातली. पाटील यांनी बाजूला होत रिक्षा अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी तशीच रिक्ष दामटवली आणि पाटील यांना फरफटत नेले. एवढेच नाही तर पुढे ती रिक्षा पाटील यांच्या अंगावर उलटवली. यात पाटील जखमी झाले. अखेर विजय पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालक व त्याच्या सहकाऱ्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.



