नंदुरबार जिल्हा

स्वयंपाकघरातील अन्न हेच खरे औषध; संतुलित आहार ठेवेल सदैव तरुण : प्रा. डी.सी. पाटील यांचा मोलाचा सल्ला

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशातील स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नाने केवळ शारीरिक गरज भागत नाही. तर ते एक उत्तम औषध आहे. धावपळीच्या युगात आहाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. पण परंतु समतोल आहारातूनच आपली प्रकृती सुदृढ होऊ शकते. संतुलित आहार ही सदैव तरुण राहण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आरोग्यमय जीवन जगण्यासाठी पारंपरिक आहाराला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ आहारतज्ज्ञ तथा निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी.सी. पाटील यांनी दिला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ‘टुडेज लाइफस्टाईल अँड आयुर्वेदिक डाएट’ या विषयावर प्रा. पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. किर्ती महाडिक होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. सौ. जागृती पवार, प्रा. ए. जे. पाटील, प्रा. मोनिका गावित, प्रा. माधवी पाटील आदी उपस्थित होते.
‘मेटाबॉलिक’ वयाला महत्त्व देणे महत्वाचे
प्रा. पाटील म्हणाले, आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शारीरिक वयापेक्षा चयापचय (Metabolic Age) वयाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. शरीरातील चयापचय क्रिया जेवढी क्रियाशील राहील, तेवढेच शरीर दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते. यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रा. पाटील यांनी उपस्थितांना व्यायामाची एक अनोखी पद्धत सांगितली. “प्रत्येकाने दररोज किमान ४०० टाळ्या वाजवल्या पाहिजेत. टाळी वाजवल्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांचे दाबबिंदू (Acupressure points) उत्तेजित होतात, ज्यामुळे अवयव कार्यक्षम राहतात आणि आजारांपासून बचाव होतो. यावेळी त्यांनी टाळ्या वाजवण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. वाढत्या आजारांवर चिंता व्यक्त करताना प्रा. पाटील म्हणाले, आज ३५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. याचे मुख्य कारण जंक फूड आणि फास्ट फूड हे आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता टिकवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळून घरी तयार केलेले अन्न ‘पूर्णब्रह्म’ समजून सेवन करावे. तसेच, दुपारची झोप टाळून रात्री किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने तर आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी मोनाली अहिरे हिने केले. या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button