गुन्हे वार्ता

५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शहाद्यातील नराधम निलेश सोमवंशीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील एका घराचे रखवालदार म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निलेश संजय सोमवंशी (रा. शहादा) याला अखेर २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्वाचा निकाल दिला. यावेळी न्यायालयाने सोमवंशी याला १५ हजार रुपये दंडही ठोठावला.
नोव्हेंबर २०२३ मध्ये नंदुरबार शहरातील एका घराच्या बांधकामामागे त्याच ठिकाणी रखवालीचे काम करणाऱ्या कुटुंबातील ५ वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे खेळात होती. याचवेळी निलेश सोमवंशी (रा. शहादा) याने डाव साधून या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी चिमुकल्या बालिकेच्या वडिलांच्या तक्रारीवरून निलेश सोमवंशी याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे यांच्याकडे होता. त्यांनी निलेश सोमवंशी याच्याविरोधातील पुराव्यात कच्चे दुवे राहणार नाहीत, याची काळजी घेत योग्य दिशेने तपस करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. पेठकर यांच्यासमोर सुरु होती.
खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. यातून त्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले, हे सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आले. आरोपाविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. पेठकर यांनी आरोपी निलेश संजय सोमवंशी याला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सहायक अभियोक्ता तुषार कापडिया व ऍड. एस.ए. गिरासे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. तर मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे, शेलेंद्र जाधव आणि दुर्गा वळवी यांनी त्यांना सहकार्य केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button