नंदुरबार जिल्हा

सातपुड्यात होलिकोत्सवाचा उत्साह शिगेला; काठीतील राजवाडी होळीसाठीचा मानाचा बांबू घेऊन पुजारी, सेवेकरी निघाले गावाकडे!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आदिवासी परंपरा, श्रद्धा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक असलेल्या होलिकोत्सवाला सातपुड्यात प्रारंभ झाला असून, गाव-पाडे ढोल-ताशे, मांदल आणि बिरीच्या गजराने दुमदुमू लागले आहेत. आता सर्वांना लक्ष लागून राहले आहे ती काठीतील जगप्रसिद्ध राजवाडी होळीकडे. काठी येथील राजवाडी होळीचा मानाचा बांबू घेऊन काठी येथील गावपुजारी आणि होळीचे सेवेकरी हे आपल्या गावाकडे निघाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील काठी येथील संस्थानिकांची राजवाडी होळी सातपुड्यात विशेष मानली जाते. विविधांगी वैशिष्ट्यांनी नटलेल्या या जगप्रसिद्ध होळीचे आकर्षण आबाल-वृद्धांपासून सर्वांनाच आहे. काठी येथील राजवाडी होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.
हा दांडा गुजरात राज्यातील नामगी परिसरातील जंगलातून ४०० किलोमीटरपेक्षा अधिकची पायपीट कटून करून काठी येथे आणला जातो. हा दांडा आणण्याची पद्धत वंशपरंपरागत आहे. सुरुवातीपासून हा दांडा निवडक कुटुंबातील सदस्य हे वंश-परंपरागत पद्धतीने आणत आहेत.
गाव आणि सामाजिक रूढी परंपरा यांचे जतन करत काठी येथील मानकरी होळीचा दांडा घेण्यासाठी हे मानकरी २७ फेब्रुवारीला सकाळी काठी येथून नामगीकडे रवाना झाले होते. गुजरात राज्यातील जंगलात जाऊन त्यांनी होळीच्या दांड्याचा शोध घेतला. तेथे होळीच्या दांड्याची निवड करून कोणत्याही हत्यारांचा वापर न करता केवळ लाकडी साहित्याने बांबूला मुळासकट काढून हे मानकरी आता होळीचा बांबू खांद्यावर घेऊन पायपीट करीत काठीकडे मार्गस्थ झाले आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी या बांबूची विधिवत पूजा-अर्चा केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button