मित्राची दुचाकी चालवायला आणली अन् तिसऱ्याने दारूच्या नशेत ती जाळून टाकली; मारहाणही केली; अक्कलकुवा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मित्राकडून चालविण्यासाठी आणलेली तिसऱ्याच व्यक्तीने दारूच्या नशेत जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबारीच्या पाटीलवाडा येथे घडली. एवढेच नाही तर जाब विचारायला गेल्यावर संशयिताने संबंधिताला शिवीगाळ आणि मारहाणही केली. या प्रकरणी सायसिंग खेमा पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडीबारीच्या पाटीलवाडा येथे राहणाऱ्या विनोद सायसिंग वसावे याने त्याचा मित्र इऱ्या भुषा पाडवी यांच्याकडून एमएच ३९ एएल १८६३ या क्रमांकाची दुचाकी काही दिवसांसाठी आणली होती. २५ फेब्रुवारीला रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास विनोद गावाजवळील शेतात देवाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने रस्त्यालगत ही दुचाकी लावली होती. गाडीशेजारी कुणीही नसल्याचे पाहून तेथे आलेल्या सायसिंग पाडवी याने दारूच्या नशेत या दुचाकीला आग लावली. या आगीत हे वाहन भक्ष्यस्थानी पडले. नंतर तेथे पोहोचलेल्या विनोदने सायसिंग पाडवी याला याबाबतचे कारण विचारले असता विचारले असता त्याने उलट विनोद यालाच शिवीगाळ व मारहाण केली. अखेर विनोद वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायसिंग पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप चौरे करीत आहेत.



