‘ती’ वेदनांनी विव्हळत होती, डॉ. अनिल बर्डे देवासारखे मदतीसाठी धावून आले अन् ‘तिची’ सुखरूप प्रसूती झाली… शहाद्यात नेमकं काय घडलं, नक्की वाचा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘अडचणीत सापडलेल्यांच्या मदतीसाठी देव कधी आणि कोणत्या रूपात धावून येत, हे कुणालाही सांगता येत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एका गर्भवतीलाही अगदी असाच “देव तारी त्याला कोण मारी” या उक्तीचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी शहादा येथे आला. प्रसूती वेदनांमुले विव्हळणाऱ्या या गर्भवतीची शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश बर्डे यांनी दाखविलेल्या तत्परता आणि सेवाभावी वृत्तीमुळे सुखरूप प्रसूती होऊन तिचे व बाळाचे प्राण वाचले.
शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मलोनी गावातील मंगलीबाई सुखदेव मोरे ही २२ वर्षीय गर्भवती प्रसूती वेदनांनी त्रस्त होती. शुक्रवारी (दि.२७) डोंगरगाव रस्त्यावरील भाऊ तात्या पेट्रोल पंप परिसरातून ती आपल्या नातेवाईक महिलांसह शहादा ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. चालताना अधिक त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबली. बराच वेळ थामूनही त्रास कमी होत नसल्याने अखेर तिच्या नातेवाईक महिलांनी तिला दवाखान्यात तातडीने नेण्याच्या हेतूने वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही थांबत नव्हते. मदतीलाही कुणी यायला तयार नव्हते. यामुळे पुढे काय होणार या चिंतेने तिच्यासह नातेवाईकही हतबल झाले होते.
याच वेळी डॉ. मंगेश बर्डे आपल्या वाहनातून रुग्णालयाकडे जात होते. रस्त्यावर वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवतीला पाहून त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून तिची विचारपूस केली. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या महिलेला आपल्या कारमध्ये बसवून थेट रुग्णालय गाठले. दरम्यानच्या काळात गाडीतूनच त्यांनी फोनवरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रसूती कक्ष तयार ठेवून आवश्यक उपचारांची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. हे संभाषण ऐकून मदतीला धावलेला व्यक्ती डॉक्टर असल्याचे कळल्याने मांगलीबाई व त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आणि प्रत्यक्ष देवदूतच मदतीला धावून आल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटले होते.
रुग्णालयात दाखल होताच मंगलीबाईवर तातडीने उपचार करण्यात आले. काही वेळातच तिची सुखरूप प्रसूती झाली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असल्याने परिवारासह शहादा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
डॉ.मंगेश बर्डे यांनी दाखविलेल्या सेवाभावी वृत्तीमुळे वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन दाखविलेल्या या मानवतावादी कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैद्यकीय सेवेत केवळ जबाबदारी नव्हे, तर संवेदनशीलता आणि तत्परता किती महत्त्वाची असते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.



