नंदुरबार जिल्हा

चिंताजनक बातमी : नंदुरबार जिल्ह्यातील ३० हून अधिक नागरिक आखाती देशांत अडकले; नातेवाईक हैराण; युद्धाचा परिणाम

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्व प्रांतासह आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम खान्देशावरही झाला आहे. या युद्धामुळे विमान सेवेवर परिणाम झाला असून, खान्देशातील तीन जिल्ह्यातील मिळून सुमारे एक हजारहून अधिक नागरिक आखाती देशांत अडकून पडले आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ३० हून अधिक जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने या सर्वांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून, लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील ३० हून अधिक जण आखाती देशांत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. सध्या आखाती देशांत युद्धजन्य परिस्थितीमुळे हे सर्व जण तिकडेच अडकून पडले असून, युद्धामुळे नातेवाईकांना या सर्वांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी लागून राहिली आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील १०१ आणि धुळे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक लोक आखाती देशांत अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी बहुतांश जण पवित्र रमझान महिन्यानिमित्त उमराह या पवित्र धार्मिकस्थळी दर्शनासाठी गेले असल्याचे कळते. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील आखातात अडकून पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेशी अद्याप संपर्क केला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या निकटच्या नातेवाईकांनी संबंधितांची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनास त्वरित कळवावी, जेणेकरून सदरील माहिती एकत्रितरित्या राज्य शासनास सादर करणे शक्य होऊन पुढील कार्यवाही सुलभ होईल, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामध्ये अडकलेल्या व्यक्तींचे नाव, पासपोर्टमध्ये नोंद असलेले पूर्ण नाव , पासपोर्ट क्रमांक, पासपोर्टच्या पानाची स्पष्ट प्रत / छायाचित्र, स्थानिक यूएई फोन क्रमांक, व्हाट्सअप क्रमांक, ई-मेल पत्ता, आखाती देशातील सध्याचे वास्तव्याचे ठिकाण, हॉटेल किंवा घर/व्यवसायाचा पत्ता, अडकण्याचे कारण (उदा. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, पासपोर्ट हरवणे, उड्डाण रद्द होणे, प्रादेशिक परिस्थिती), व्हिसा तपशील, व्हिसाचा प्रकार (पर्यटक, निवासी इ.), व्हिसाची समाप्ती तारीख असा तपशील देण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार किंवा पोलिस नियंत्रण कक्ष (ग्रामीण) यांना संपर्क करता येईल, असेही कळविण्यात आले आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button