होळीच्या रंगात न्हाऊन निघाला सातपुडा; आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; असली गावातील मानाची होळी उत्साहात, पाडवी द्वयींची विशेष उपस्थिती

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असलेले आदिवासी बांधव सध्या होळीच्या रंगात पूर्णपणे रंगून गेले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सातपुड्यातील विविध दुर्गम भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळखीच्या भावनेत साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या केंद्रस्थानी आदिवासी जीवनशैली, नृत्य, वाद्ये आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील असली गावातील मानाची होळी विशेष लक्षवेधी ठरली. या होळीला माजी आदिवासी मंत्री के.सी. पाडवी आणि नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांची उपस्थिती लाभली. मानाची होळी असल्याने ती परंपरेनुसार सकाळीच विधिवत प्रज्वलित करण्यात आली.
या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी आदिवासी परंपरेचा मान राखत पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. अंगावर पारंपरिक पोशाख, दागिने आणि डोक्यावर आदिवासी शिरोभूषण घालून त्यांनी होळी उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. ढोल आणि बिजरीच्या तालावर खा. पाडवी व माजी मंत्री पाडवी पारंपरिक पद्धतीने थिरकताना दिसून आले. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित आदिवासी बांधवांमध्ये विशेष उत्साह संचारल्याचे स्पष्ट दिसत होते.
असली गावातील ही मानाची होळी केवळ उत्सव न राहता आदिवासी एकतेचे, सामाजिक सलोख्याचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरली. या होळीला परिसरातील विविध गावांतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनीही या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येत आदिवासी संस्कृतीचा सन्मान करत उत्सव साजरा केला.
सातपुडा पर्वतरांगांतील होळी उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ रंगांची उधळण नसून निसर्गाशी नाते, पूर्वजांची स्मृती आणि समाजातील ऐक्य यांचे दर्शन घडवणारा सोहळा असतो. पारंपरिक नृत्य, लोकवाद्यांचा नाद, सामूहिक भोजन आणि धार्मिक विधी यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व प्राप्त होते.
सातपुड्यातील आदिवासी बांधवांनी जपलेली ही परंपरा आजही आधी इतक्याच जोमाने पुढे चालू असल्याचे असली गावातील मानाच्या होळीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपली संस्कृती, रूढी आणि उत्सव जतन करणारा सातपुडा आजही आदिवासी अस्मितेचा मजबूत किल्ला असल्याचे चित्र या होळी उत्सवातून स्पष्टपणे दिसून आले.



