गुन्हे वार्ता

नंदुरबार जिल्ह्यात तोतया पोलिसांचा खऱ्या पोलिसांकडून पर्दाफाश; तिघांना ठोकल्या बेड्या, ‘पोलिस’ लिहिलेले वाहनही जप्त; महामार्गावर वाहने अडवून सुरू होती लूट

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र व गुजरात सीमाभागात तोतया पोलिसांनी उच्छाद मांडला असून, यातील एका टोळीचा पर्दाफाश करून त्यांना बेड्या ठोकण्यात नागपूरच्या खऱ्या पोलिसांना यश आले आहे. वाहनावर पोलिस लिहून धुळे- सुरत महामार्गावर नवापूरनजीक गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना थांबवून तपासणी करीत लूट करताना तीन तोतया पोलिसांची ही टोळी खऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडली. नवापूर पोलिसांनी या तिघांना अटक करतानाच त्यांच्या ताब्यातील पाच लाख रुपये किमतीचे वाहन देखील जप्त केले. हे तिघेही तोतया मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्मातील आहेत
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुमानसिंग रघुवीरिसंग कुसवा (रा. इंदोर), कमल तेजराम चौहान (रा. देपालपूर, इंदोर) व प्रताप सरदार सिसोदिया (रा. जव्हार टेकडी, इंदोर) असे गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नवापूर जिल्ह्यात गुजरात सीमेनजीक नवापूरजवळ आरटीओ चेक नाक्याच्या पुढे काही जण गुजरातेतून येणाऱ्या वाहनांना अडवून कागदपत्रांची मागणी करून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. काही जणांना शंका आल्याने त्यांनी याबाबत नवापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. यावेळी इंग्रजी भाषेत मोठ्या अक्षरात ‘पोलिस’ लिहिलेले एक वाहन त्यांच्या नजरेस पडले. तर बाजूलाच तीन जण पोलिस वेशात वाहनधारकांना अडवून तपासणी करीत असल्याचेही दिसून आले.
नवापूरच्या खऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांच्याजवळ जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. परंतु, या तिघांकडे पोलिस असल्याचा पुरावा दाखवणारी कुठलीही कागदपत्रे किंवा ओळखपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने वाहनासह तिघांना नवापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
वाहनाचा नंबरच बदलला
पोलिस ठाण्यात आल्यावर हे तिघे वापरत असलेल्या वाहनाची तपासणी करण्यात आली. ती पाहिल्यावर पोलिस आश्चर्यचकित झाले. कारण, वाहनाच्या मूळ कागदपत्रात वाहनाचा नंबर मध्यप्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांनी मध्यप्रदेशातील वाहनाची मूळ नंबर प्लेट (क्र. एमपी 0९ झेडडब्ल्यू ३६४) बदलवून महाराष्ट्राची नंबर प्लेट (क्र. एमएच ११ पीएन ७७०८) लावल्याचे स्पष्ट झाले.
बनावटपणा समोर आल्यानंतर याप्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद पराडके यांनी फिर्याद दिल्याने या तिघांविरुद्ध नवापूर पोलिसात तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक करून त्यांच्या ताब्यातील पाच लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक केशव गावित या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, या तिघांनी आणखी किती आणि कुठल्या ठिकाणी अशा प्रकारचे कारनामे केले आहेत याची तपासणी नवापूर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र व गुजरात सीमाभागात तोतया पोलिसांनी उच्छाद मांडल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने खऱ्या पोलिसांना अशा तोतया पोलिसांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले असले तरी या घटनेमुळे तोतयांनी सुरक्षा व्यवस्थेला छेद पाडल्याची चर्चा सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button