सातपुड्यात शाही होळी : मंत्री अशोक उइके धडगावात आदिवासी बांधवांसोबत साजरा करणार उत्सव; भोंगऱ्या बाजाराचाही आनंद लुटणार

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये होळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके आज सोमवारी (दि.२) या भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा करणार आहेत. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण धडगाव शहरात भरणारा प्रसिद्ध भोंगऱ्या बाजार असणार आहे. होळी सणानिमित्त या बाजारातून निघणाऱ्या ऐतिहासिक शाही मिरवणुकीत मंत्री अशोक उइके स्वतः सहभागी होणार असून, पारंपरिक वाद्ये, लोकनृत्ये आणि आदिवासी पोशाखातील सहभागींच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीला उत्सवी स्वरूप प्राप्त होणार आहे.
होळी हा आदिवासी समाजातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या निमित्ताने मंत्री उइके आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या समस्या, अडचणी आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेणार आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगार यांसारख्या विषयांवर चर्चा करताना शासनाच्या विविध योजनांची माहितीही ते देणार आहेत.
सातपुड्यात शाही होळी साजरी करून आदिवासी संस्कृतीला सन्मान देण्याचा संदेश या दौऱ्यातून दिला जाणार असून, स्थानिक नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



