गुन्हे वार्ता

नवापूर हादरले : चोरट्यांनी हिंमत पहा, तहसीलदारांचेच घर फोडले; मागील दरवाजा तोडून प्रवेश; कपाटे फोडली, पत्नीच्या पर्सचीही उचकापाचक!

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात चोरट्यांची हिंमत वाढतच चालली असून, आता चोरट्यांनी थेट नवापूर तहसीलदारांचे घरच टार्गेट करीत पोलिसांनाच आव्हान दिले आहे. नवापूर शहरातील मंगळदास पार्क परिसरात नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री धाडसी घरफोडी केली असून, भरवस्तीत आणि उच्चभ्रू भागात घडलेली घटना सध्या नवापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनली आहे.
तहसीलदार दत्तात्रय जाधव हे कुटुंबासह देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले आहेत. त्यातच आलेल्या सलग सुट्यांचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी (दि.१) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेला लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. बेड आणि पलंगावरील वस्तूंचीही उचकापाचक करण्यात आली. जाधव यांच्या पत्नीची पर्स तपासून तीही घरात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळली. मात्र, नेमका किती ऐवज, रोख रक्कम किंवा मौल्यवान साहित्य चोरीला गेले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तहसीलदार जाधव परतल्यानंतरच नेमकी हानी किती झाली याचा उलगडा होणार आहे.
सकाळी साफसफाईसाठी आलेल्या महिलेला मागील दरवाजा तुटलेला दिसून आला. तिने शेजाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकानेही तपासासाठी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
श्वानपथकाने संभाव्य मार्ग दाखविल्याची माहिती मिळत असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरीच अशी घटना घडल्याने नागरिकांनी तातडीने आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लवकरच गुन्हेगारांचा माग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button