धडगावच्या भोंगर्या बाजारात मंत्र्यांसह दोन आमदारांनी धरला ठेका; होळीनिमित्त आदिवासी संस्कृतीचा जल्लोष

धडगाव (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा उत्साह, जीवनशैली आणि परंपरेचा संगम असलेल्या होलिकोत्सवाचा उत्साह टोकाला पोहोचला आहे. याच परंपरेचे दर्शन घडवणारा धडगाव येथील भोंगर्या बाजार सोमवारी (दि. २) उत्साहात पार पडला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्यासह आमदार आमश्या पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी या बाजाराचा आनंद लुटतानाच आदिवासी बांधवांच्या सोबत आदिवासी वाद्यांच्या तालावर ठेका धरत नृत्यही केले.
धडगावचा भोंगऱ्या बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा व वैशिष्ट्यपूर्ण बाजार मानला जातो. आज, सोमवारी दुपारी भोंगर्याची भव्य मिरवणूक निघाल्यानंतर, नंदुरबार जिल्ह्यातील होळी आणि तिच्याशी निगडित पारंपरिक परंपरांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंत्री उइके जिल्हा दौऱ्यावर होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, ढोल-नगाऱ्यांचा निनाद आणि नृत्याच्या ठेक्यांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय केला होता.
या उत्साहपूर्ण वातावरणात धडगाव परिसरातून आलेल्या आदिवासी बांधवांनाही नृत्याचा मोह आवरता आला नाही. त्यांच्या आनंदात सहभागी होत मंत्री अशोक उइके यांनी आपल्या समवेत असलेले आमदार आमश्या पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्यासह पारंपरिक आदिवासी वाद्यांवर ठेका धरला. मंत्री आणि लोकप्रतिनिधी थेट जनतेत मिसळून नाचताना दिसल्याने उपस्थित आदिवासी बांधवांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
भोंगर्या बाजार व होळी उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाला दिलेला हा सन्मान सातपुड्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरला असून, या क्षणांची चर्चा सर्वत्र होत आहे.



