काठी संस्थानच्या राजवाडी होळीने सातपुड्यात होलिकोत्सव पर्व सुरू; शेकडो पथकांचा उत्स्फूर्त सहभाग; मंत्री, आमदारांच्या सहभागाने उत्साह द्विगुणित

शहादा (सलाउद्दीन लोहार थेट काठी येथून) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग परिसरातील आदिवासी समाजाच्या पारंपरिक होळी पर्वाला यंदा दिमाखदार सुरुवात झाली. दुर्गम भागातील काठी संस्थानच्या मानाच्या राजवाडी होळी महोत्सवाने या उत्सवाचा उद्घोष केला. सुमारे सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या होळी पर्वाच्या प्रारंभासोबतच सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील होलिकोत्सवाचा उत्साह चरम सीमेला पोहोचला आहे.
जगभर प्रसिद्ध असलेल्या काठीच्या होळीला आदिवासी समाजात अनन्यसाधारण धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. परंपरेनुसार, यंदाही सुमारे तीनशे किलोमीटर पायी प्रवास करून होळीचा बांबू गुजरात राज्यातून आणण्यात आला. आदिवासी पुजार्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बांबूचे प्रत्यारोपण करण्यात आले. या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण परिसर भक्तीभावाने भारावून गेला होता.
महोत्सवात परिसरातील शेकडो गावांमधील पारंपरिक बावा, बुध्या, गेर तसेच ढोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ढोल, टिमरी, पावा, बेरी आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण दुमदुमून गेले होते. अस्सल आदिवासी परंपरा, श्रद्धा, भक्तीभाव आणि हर्षोल्हासात रात्रभर होळीचा फेर धरण्यात आला.
आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास विधिवत होळी प्रज्वलित करण्यात आली. पेटत्या होळीभोवती विविध पथकांनी भक्तिभावाने फेर धरला. होळीचा दांडा जमिनीवर पडल्यानंतर त्याचा शेंडा हत्याराने एका झटक्यात कापण्याची परंपरा आहे. एका वारात शेंडा कापला गेल्यास तो शुभ संकेत मानला जातो. या वेळी भाव, भक्ती आणि उत्साह शिगेला पोहोचला होता.
या मानाच्या होळीचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रसह शेजारच्या मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतील पारंपरिक पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी होळीला भेट देत आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश पाडवी व आमदार आमश्या पाडवी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने पथदिवे, एलईडी व्यवस्था, दर्शक दीर्घा, अग्निशमन दल तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. पारंपरिक वारसा आणि सामाजिक ऐक्य जपत सातपुड्यातील हा राजवाडी होळी महोत्सव यंदाही उत्साहात पार पडला.



