नंदुरबार जिल्हा

धडगाव तालुक्यात भीषण आग; रक्ताचे पाणी करून कमाई केली अन् क्षणार्धात संसाराची झाली होळी; आग विझवायला वेळेवर पाणीही मिळाले नाही…

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्या पर्वतरांगांतील आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघालेला असतानाच धडगाव तालुक्यातील बर्डीपाडा (चुलवड) येथील विक्रम तडवी यांच्या कुटुंबियांवर मात्र ऐन होळीच्या पूर्वसंध्येला संक्रांत कोसळली. रविवारी दुपारी घराला लागलेल्या भीषण आगीत तडवी यांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या कुटुंबाचे दुर्दैव इतके की गावात कमालीची पाणीटंचाई असल्याने हे घर जळत असताना आग विझवण्यासाठी वेळेत पाणीही मिळू शकले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डीपाडा (चुलवड ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील विक्रम तडवी हे मोलमजुरीचे काम करून चरितार्थ चालवतात. पंढरपूर येथे रात्रंदिवस मेहनत करून जपून कमावलेली रक्कम त्यांनी कुंबीयांच्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी घरात ठेवली होती. रविवारी (दि. १) दुपारच्या सुमारास तडवी कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले होते. याच काळात त्यांच्या घराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की क्षणार्धात हे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरी कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील वस्तू जळून खाक झाली. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत कपडे, अन्नधान्य, भांडीकुंडी, कागदपत्रे आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे कपाटात ठेवलेल्या ९५ हजार रुपयांच्या नोटांचीही आगीत राख झाली.
आग विझवायला वेळेवर पाणीही नाही
तडवी कुटुंबाचे दुर्दैव असे की ही आग विझवायला वेळेवर पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही. बर्डीपाडा व परिसरात असलेली पाणीटंचाई याला कारणीभूत ठरली. आग लागल्याचे पाहून गावातील काही लोकांनी नाही म्हणायला नदीच्या झऱ्यातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये बराच वेळ गेल्याने तडवी यांचे घर जळून खाक झाले आणि ग्रामस्थांचे वेळेत आग विझविण्याचे प्रयत्नही फोल ठरले. या निमित्ताने गावातील पाणीटंचाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलं आहे. पाणीटंचाईमुळे तडवी यांचे घर आणि संसार वाचविण्यात अपयश आल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button