आम्ही सुरक्षित आहोत, काळजी नसावी; शहाद्याचा आयुष, म्हसावदचा सौरभ आखातात अडकूनही सुखरूप; अग्रवाल, चौधरी कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला!
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही सुरक्षित आहोत. स्थानिक प्रशासनाने आमची खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था पण केली आहे, काळजी करू नका’, हे शब्द आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील आयुष राजेंद्र अग्रवाल याचे. अमेरिका व इस्रायल यांच्याकडून इराणवरील झालेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत आयुष्य अबूधाबीमध्ये अडकला असून, तेथून त्याने वडील राजेंद्र अग्रवाल याच्याशी संपर्क साधून आपण सुरक्षित असल्याचे कळवले आणि अवघ्या अग्रवाल कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. आयुषप्रमाणेच म्हसावद (ता. शहादा) येथील सौरभ चौधरी हाही दुबईत अडकला असून, त्यानेही आपण सुरक्षित असल्याचा संदेश दिला आहे.
शहादा येथील प्रतिष्ठित व्यापारी आणि आई श्री सप्तशृंगी माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांचे चिरंजीव आयुष्य हा गेल्या सात वर्षांपासून इंग्लंडमधील मँचेस्टर येथे कार्यरत आहे. तेथील माय प्रोटीन कंपनीत तो नोकरी करतो. तीन महिन्यांपूर्वी तो मित्राच्या लग्नानिमित्त शहादा येथे आला होता.
हा समारंभ आटोपून तो परत निघाल्यानंतर आयुष पर्यटनासाठी अबुधाबी येथे थांबला होता. तेथून तो मँचेस्टरके रवाना होत असतानाच अमेरिका व इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि परिस्थिती बदलली. या हल्ल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि अबूधाबीचे विमानतळ हवाई उड्डाणांसाठी बंद करण्यात आले. यामुळे साहजिकच येथून परदेशी निघालेले सर्वच प्रवासी तेथे विमानतळावरच अडकून पडले. याच दरम्यान त्याने आपण सुरक्षित आहोत. आधी परिस्थिती बिघडली होती. मिसाईलचे मोत्याने आवाज येत होते. मात्र, आता त्यात बदल झाला आहे. भीती कमी झाली आहे. आम्ही सुरक्षित आहोत. स्थानिक प्रशासन आमची काळजी घेत आहे. माझ्यासह सर्वच प्रवाशांची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयुष याने वडिलांना कळवले. यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.
म्हसावदच्या सौरभच्या मायदेशी परतण्यासाठी हालचाली
आयुष अग्रवाल यांच्याप्रमाणेच शहादा तालुक्यातील म्हसावद येथील २१ वर्षीय सौरभ भगवान चौधरी हा दुबई येथे अडकून पडला आहे. सौरभ हा म्हसावद येथील एलआयसीचे चेअरमन क्लब मेंबर भगवान पुरुषोत्तम चौधरी यांचा चिरंजीव आहे. तो दुबई व अबुधाबी येथे हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेला होता. अमेरिका व इस्रायल यांच्याकडून हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले सुरु केले आहेत. यामुळे आखाती देशांतील बहुतांश विमानतळ बंद झाले असून, दुबई विमानतळ बंद असल्याने सौरभ तेथेच अडकून पडले आहेत. त्याचा कुटुंबियांशी संवाद झाला असून, त्याला परत भारतात आणण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. भारतीय दूतावासाकडूनही सातत्याने संपर्क सुरु असून, परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप भारतात परत पाठविण्यात येईल, असे दूतावासाकडून सांगण्यात आल्याचे सौरभ चौधरी याने कळवले आहे.
दरम्यान, आयुष व सौरभ यांच्याप्रमाणेच सुमारे २० हजारांहून अधिक भारतीय नागरिक आखाती देशांत अडकले असून, त्यांना परत भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे.



