धुळे – सुरत महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळली; नवापुरच्या भट कुटुंबातील 6 जण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धुळे – सुरत महामार्गावर पुढे चाललेली ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारून थांबविल्याने मागून येणारी भरधाव कार त्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात नंदुरबार जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून, सर्वांवर धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी नवापूर येथील प्रा. किरण राजेंद्र भट यांच्या कुटुंबातील असून, यात दोन पुरूष, तीन महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापुरच्या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक किरण भट (40, रा. मंगळदास पार्क, नवापूर, जि. नंदुरबार) हे सोमवारी (दि. 1) दुपारच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसह जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या मुळ गावाहून धुळेमार्गे नवापुरकडे निघाले होते. या कुटुंबाचा प्रवास एमएच 02 – 8462 या कारमधून सुरू होता. त्याचवेळी या कारच्या समोर टीएन 90 डी 8952 या क्रमांकाचा ट्रक चालला होता. दरम्यान दहिवेल परिसरात महामार्गावर या ट्रकच्या स्टेपनीचे टायर निखळून रस्त्यावर पडले. यामुळे कारचालक किरण भट गोंधळून गेले. त्यांनी तातडीने कार एका बाजूला वळवली. याच दरम्यान ट्रकचालकानेही जोरदार ब्रेक मारून एका हॉटेलजवळ डिव्हायडरच्या बाजूला अचानक ट्रक थांबवला. या सगळ्यामध्ये कारचालकाचा गोंधळ अधिकच वाढला आणि कार थेट ट्रकच्या मागच्या भागावर जावून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या धडकेमुळे जोरदार आवाज झाला आणि आसपासच्या लोकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर सर्वांना बाहेर काढून तातडीने साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना त्वरित धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
किरण राजेंद्र भट (40), राजेंद्र भट (65), राजश्री भट (60), सरिता भट (35), शोभा कुलकर्णी (60), गौरी भट (7) आणि शिव भट (3) अशी या सर्व जखमींची नावे आहेत. यापैकी शिव भटवगळता इतर सर्वांनाच जबर मार लागला असून, त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



