तळोदा-शहादा परिसर होणार पाणीदार; बोरद, चिनोदा, खरवडमध्ये गेटेड सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण, आ. राजेश पाडवी म्हणाले, ‘शिरपूर पॅटर्न’ राबविणार

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुडा पर्वतावरून येणाऱ्या सर्व नदी–नाल्यांवर आगामी काळात आणखी बंधारे उभारून शिरपूर पॅटर्न राबविण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक लाभ आपल्या भागातील शेतकर्यांना होणार असून, या बंधार्यांमुळे तळोदा – शहादा तालुके पाणीदार होणार आहेत, अशा शब्दांत आमदार राजेश पाडवी यांनी या भागातील शेतकर्यांच्या स्वप्नांना पंख दिले.
तळोदा तालुक्यातील बोरद, चिनोदा, खरवड येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात आलेल्या गेटेड सिमेंट बंधाऱ्यांचे लोकार्पण शहादा–तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आ. पाडवी म्हणाले, बंधाऱ्याच्या उभारणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पाण्याची उपलब्धता लक्षणीय वाढेल. गेटेड सिमेंट बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी साठवून ते जमिनीत झिरपण्यास मदत होईल. परिणामी उन्हाळ्यातही विहिरी व बोअरवेलमध्ये पाण्याची उपलब्धता टिकून राहील. अशा जलसंधारणाच्या उपक्रमांमुळे भूजल पातळी वाढून शेती विकासाला मोठा वेग मिळेल.
ते पुढे म्हणाले, बोरद हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे जोडणाऱ्या मार्गांचे डांबरीकरण करून ते अधिक मजबूत केले जाणार आहे. “बोरदला १५ पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली असून यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मोठी मदत होईल,” असेही त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील विकासकामांसाठीही सक्रियपणे पाठपुरावा सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह राणा, सरपंच प्रतिनिधी रविन भिलाव, उपसरपंच संतोष ढोढरे, मनोज जोहरी, शांतीलाल पवार, कांतीलाल ठाकरे, संजय ठाकरे, अजय मगरे, दीपक जाधव, किशोर जाधव, गौतम भिलाव, किरण सूर्यवंशी, प्रफुल्ल माळी, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



