शहादा तालुक्यात भीषण अपघात; वडाळीजवळ दुचाकी–टाटा मॅजिकची धडक, युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील वडाळी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शहादा शहरातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. दुचाकी आणि टाटा मॅजिक वाहनामध्ये झालेल्या या युवकाला जीव गमवावा लागला.
मृत युवकाचे नाव हेमंत जगदीश कोळी (रा. विजय नगर, शहादा, जि. नंदुरबार) असे असून, अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अशोक दयानंद ईशी (रा. नागसेन नगर, शहादा) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत कोळी हा मित्र अशोक इशी याच्यासोबत एमएच ३९ एइ ०८९७ क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून शिरपूर (जि. धुळे) येथून रविवारी सायंकाळी उशीरा शहादाकडे परत येत होते. याच दरम्यान वडाळी गावाकडून भरधाव वेगात येणार्या एमएच १३ एझेड १८१० या क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाच्या चालकाने कोळी यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. दोघांनाही जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी हेमंत कोळी याला मृत घोषित केले. यामुळे कोळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी राजेश्वर जगदीश कोळी (शिरसाठ) यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा टाटा मॅजिक वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.



