तळोदा नगराध्यक्षांचे दातृत्त्व भारी, क्षयरुग्णांना तारी; निक्षय मित्र बनून २५ रुग्णांना केले पोषक आहाराचे वाटप

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘आपल्या लोकांची काळजी आपण घ्यायची असते’, हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून काम करणार्या तळोदाच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व त्यांचे पती योगेश चौधरी यांनी आपल्या सेवाव्रती भूमिकेचे आणखी एक उदाहरण तळोदावासीयांसमोर ठेवले आहे. चौधरी दाम्पत्याने निक्षय मित्र बनून तब्बल २५ क्षयरुग्णांना स्वखर्चातून पोषक आहाराचे वाटप करून त्यांच्या चेहर्यावर हसू उमलवले.
प्रधानमंत्रीटीबी मुक्त भारत अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने टीबी मुक्त भारत करण्याचे धोरण अवलंबले आहे. सर्वाधिक मृत्यू होणार्या प्रमुख १० संसर्गजन्य आजारांच्या यादीत क्षयरोगाचा समावेश होतो. त्यामुळे भारतासह जगभरात क्षयरोग आजार व त्यामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. याच अंतर्गत भारतात क्षयरोग दुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, टीबीमुक्त भारताच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत.
पोषक आहार न मिळणार्या व्यक्तीला क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच क्षयरोग झालेल्या व्यक्तीस उपचार कालावधीत पोषण आहार न मिळाल्यास त्याला उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता केंद्र शासनाने प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान सुरु केले आहे. या मध्ये विविध देणगीदार (व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकार सेवा, विविध संस्था, निवडून आलेले लोकप्रतिनिधी इ.) यांना निक्षय मित्र असे संबोधण्यात येते. त्यांच्या मार्फत क्षयरुग्णांना औषधोपचार दरम्यान कोरडा आहार पुरविण्यात येतो.
या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहित वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तींच्या सहभाग निक्षय मित्र म्हणून नोंदवण्यात आला. तळोदावासीयांची नेहमीच काळजी घेणार्या नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी व युवा नेते योगेश चौधरी यांनीही निक्षय मित्र उपक्रमांतर्गत सहभाग नोंदवला आहे. केवळ नाव नोंदवून न थांबता या दाम्पत्याने तळोदा परिसरातील २५ गरजू क्षयरुग्णांना स्वखर्चातून पोषण आहाराचे वाटपही केले. यामध्ये प्रत्येक क्षयरुग्णाला महिन्याला पुरेल इतका गुळ, शेंगदाणे, डाळी, तेल इत्यादी पोषण आहाराचे नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास स्वयंसेवक योगेश चौधरी तसेच नगरसेवक रामानंद शिरीष कुमार ठाकरे, इमरान मेहमूद खाटीक, शितल लक्ष्मण पाडवी, प्रतिभा दीपक पाडवी, कल्पेश जगदीश चौधरी, हर्षा मनोज पाडवी, गायत्री अरुण पिंपळे, लक्ष्मी विजय नाईक, अरविंद बबन प्रधान, मीराबाई ऋतू कोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राजपूत, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील वाघ, दिलीप पाटील, हितेश गांगुर्डे, प्रमोद मराठे, सागर बैसाने, देवेंद्र राठोड, गिरासे, गौतम वळवी, टीबी सुपरवायझर बाळू पाटील, कौस्तुभ बडोदेकर, एलटी हेमलता वळवी, भारती कापडे आदी उपस्थित होते.



