शहादा तालुका हादरला; कहाटुळमधील ६५ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह २३ दिवसांनी शेतात सापडला; घात की अपघात, चर्चेला उधाण

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ गावातील बेपत्ता असलेल्या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह तब्बल २३ दिवसांनंतर गावाजवळील शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राणुबाई दुलब इशी (रा. कहाटुळ, ता. शहादा) असे या महिलेचे नाव असून, त्या ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे दहा वाजेपासून बेपत्ता होत्या. आता थेट त्यांचा मृतदेहच सापडल्याने त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की घातपात याबाबत संपुर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०२६ रोजी कहाटुळ गावातील छोटू पाटील यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असता मृत महिला ही बेपत्ता असलेल्या राणुबाई दुलब इशी या असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.
राणुबाई इशी या साध्या व शांत स्वभावाच्या होत्या. ८ फेब्रुवारी रोजी त्या कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. २४ तास उलटल्यानंतरही त्या न परतल्याने कुटुंबीयांनी शहादा पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली होती. पोलिस राणुबाई यांचा शोध घेत असतानाच तब्बल २३ दिवसांनंतर मंगळवारी (दि.३) धुलिवंदनाच्या दिवशी त्यांचा मृतदेहच एका शेतात सापडला. तेथील शेतमजुरांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी खात्रीसाठी राणुबाई यांच्या नातेवाईकांनी तेथे पाचारण केले. यानंतर राणुबाई यांचे भाउ कृष्णा पवार यांनी राणुबाई यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून मृतदेहाची ओळख पटविली. राणुबाई इशी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. प्राथमिक तपासात घातपात, अपघात की नैसर्गिक मृत्यू याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मात्र मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या परिसराची पाहणी करून पोलिस विविध शक्यता तपासत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी संदीप वाघे करीत असून, अधिक माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गावकऱ्यांमध्ये मात्र या घटनेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून, पोलिसांनी सत्य परिस्थिती लवकरात लवकर समोर आणावी अशी मागणी होत आहे.



