नंदुरबार जिल्हा

चुलवडच्‍या आदिवासी ऊसतोड मजुराच्‍या मदतीला धावले बिरसा फायटर्स; आर्थिक मदतीसह नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : चुलवड (ता. धडगाव) येथील आगीत घर भस्‍मसात झालेल्‍या विक्रम उर्फ पिंट्या तडवी याच्‍या कुटुंबियांच्‍या मदतीला अखेर बिरसा फायटर्स संघटना धावून आली आहे. या संघटनेने तडवी याच्‍या पत्‍नीकडे आर्थिक मदत सोपवितानाच या प्रकरणात तडवी कुटुंबाला शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही संघटनेने अक्राणी तहसीलदार आणि धडगाव पंचायत समितीच्‍या गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चुलवड गावात बर्डीपाडा येथे १ मार्च रोजी विक्रम उर्फ पिंट्या पिद्या तडवी ला उसतोड मजुराचे घर आगीत बेचिराख झाले. या आगीत घरकुल योजनेचे व पंढरपूरहून मजूरी करून आणलेले ९५ हजार रुपयांची रोकडही भस्‍मसात झाली. या पाड्यात पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याअभावी आग वेळेत विझवता आली नाही. त्यामुळे तडवी कुटुंबाची एकही संसारोपयोगी वस्तू वाचली नाही. आगीत घरासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्‍या होत्‍या. यामुळे हे कुटुंब पुरते उघड्यावर पडले आहे.

बिरसा फायटर्स संघटनेने घटनेची दखल घेत तातडीने चुलवड येथे जावून विक्रम तडवी याच्‍या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी संघटनेच्‍या वतीने तडवी याची पत्‍नी सविता तडवी हिला काही रक्कम रोख स्‍वरूपात मदत म्‍हणून देण्‍यात आली. यानंतर संघटनेच्‍या पदाधिकार्‍यांनी अक्राणी तहसीलदार व धडगाव पंचायत समितीच्‍या गटविकास अधिकार्‍यांची भेट घेतली. तडवी यांच्‍या घराचा पंचनामा करून त्‍यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, असे निवेदन संघटनेच्‍या वतीने दोन्‍ही अधिकार्‍यांना देण्‍यात आले.

यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, धडगाव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी, सचिव मुकेश पावरा, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, चंद्रकांत पावरा, शहादा तालुक्यातील सुरेश पवार, दिलीप मुसळदे, आकाश भील, प्रकाशा गाव अध्यक्ष एकनाथ भील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या दुख:द प्रसंगी बिरसा फायटर्स़ संघटना या आदिवासी मजूर कुटुंबासोबत असून, त्‍यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी संघटना सर्वतोपरी मदत करेल. असे सांगून सुशिलकुमार पावरा यांनी इतरांनाही या कुटुंबाला स्‍वेच्‍छेने मदत करण्‍याचे आवाहन केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button