शहाद्यात कचर्याचे ढिग, नाल्या तुडुंब भरलेल्या, दुर्गंधीला शहरवासीय वैतागले; शिवसेना भडकली, न.प.त दिली धडक!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘गाव तसं चांगलं, पण अस्वच्छतेने माखलं’, असे शहादा शहराच्या बाबतीत बोलले जावू लागले आहे. शहरात जागोजागी कचर्याचे ढिग साचले असून, गटारी दूषित पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव होवून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) नगर परिषद प्रशासनाला तातडीने याकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर समस्या तातडीने न सोडवल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शहादा शहरातील बाजारपेठ तसेच सर्व रहिवासी कॉलनींमध्ये वाढलेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे शहादा नगरपालिका प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. तालुकाप्रमुख मल्लेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेत जाऊन हे निवेदन दिले.
शहरातील बहुतांश गटारी कचरा व साचलेल्या दूषित पाण्याने तुडुंब भरल्या असून अनेक ठिकाणी तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी व धुरणी मोहीम राबविण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठ व रहिवासी भागांमध्ये रस्त्यालगत बांधकाम साहित्य साठवून ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी खुल्या जागांमध्ये झाडे-झुडपे प्रचंड वाढल्याने अस्वच्छता वाढत असून साप-कीटकांचा धोका निर्माण होत आहे. तसेच शहरातील अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून भविष्यात जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील प्रत्येक सार्वजनिक व खाजगी खुल्या जागेची स्वच्छता, गटारींची तातडीने सफाई, नियमित कचरा उचल व्यवस्था, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती तसेच अतिक्रमण व अडथळे दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख मल्लेश जयस्वाल यांनी दिला. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निवेदनानंतर नगरपालिका प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



