नंदुरबार जिल्हा

विनाहेल्‍मेट म्‍हणजे पावतीच थेट; नंदुरबार जिल्‍ह्यात ‘आरटीओ’च्‍या जाळ्‍यात अडकले ८७८ दुचाकीस्‍वार; ६.१२ लाखांचा दंड

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘दुचाकी चालवताना हेल्‍मेट वापरा अन् जीव सावरा’ अशी जनजागृती परिवहन विभाग करीत असला तरी त्‍याकडे दुचाकीस्‍वार दुर्लक्ष करीत असल्‍याचे वास्‍तव नंदुरबार जिल्‍ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या कारवाईतून समोर आले आहे. कारण या विभागाने गेल्‍या दोन महिन्‍यांत विनाहेल्‍मेट दुचाकी पळवणार्‍यांवर केलेल्‍या कारवाईत तब्‍बल ८७८ दुचाकीस्‍वार अडकले असून, रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत त्‍यांच्‍याकडून तब्‍बल ६ लाख १२ हजारांहून अधिक रुपयांच्‍या दंडाची वसुली करण्‍यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १ जानेवारीपासून विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांची व्यापक तपासणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून, यात सर्वाधिक ८७८ वाहनचालक अडकले आहेत. त्‍यांच्‍याकडून तब्बल ६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय मुदत संपलेल्या वाहनांची कागदपत्रांची तपासणी केल्‍यानंतर ३३० वाहनांच्‍या कागदपत्रांत त्रुटी आढळल्‍या. त्‍यांच्‍याकडून ‘आरटीओ’च्‍या रस्‍ता सुरक्षा विभागाच्‍या पथकांनी ४ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सोबतच सीट बेल्ट न लावता चारचाकी वाहन चालवणाऱ्या ४७ वाहनचालकांवरही कारवाई करत ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. एकंदरीत गेल्‍या अवघ्या दोन महिन्यांत एकूण १ हजार २५५ वाहनांवर वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी कारवाई करण्‍यात आली असून, उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्‍यांच्‍याकडून तब्बल ११ लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ही कारवाई नियमित आणि काटेकोरपणे सुरू राहणार असून, परिणामी जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. ‍
– उत्तम जाधव (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button