शहादा न्यायालयाचा महावितरणला दणका; ठोठावला १६ लाखांचा दंड, जमिनीवर पडलेल्या तारांनी घेतला होता धडगावच्या तरुणीचा बळी
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विद्युत वाहिन्यांची योग्य दखल न घेण्याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड या कंपनीला बसला आहे. रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांमुळे झालेल्या तरुणीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून शहादा दिवाणी न्यायालयाने महावितरण कंपनीला १५ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम सदरील तरुणीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
धडगाव तालुक्यातील आचपा येथील आरती जिर्या पावरा ही २७ वर्षीय तरुणी २८ जून २०२२ रोजी तिसनमाळ डोंगर परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. याचदरम्यान रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होवून ती जागीच गतप्राण झाली होती. या प्रकरणी सुरूवातीला धडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात आरतीसह एका शेळीचा मृत्यू विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
यानंतर आपल्या मुलीच्या मृत्यूला वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत आरतीचे वडिल जिर्या विल्ला पावरा यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात शहादा येथील दिवाणी न्यायालयात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश यू.एन. पाटील यांच्यासमोर झाली.
या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब, कागदपत्रे व इतर पुरावे यांचा सखोल विचार करता वीज वितरण कंपनीने विद्युत वाहिन्यांची योग्य दखल न घेतल्यामुळेच सदरील घटना घडल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. तसेच वीज वितरण कंपनीला तरुणीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून न्या. पाटील यांनी सदरील तरुणीच्या कुटुंबियांना १५ लाख ६९ हजार ४०० रुपये आणि मृत शेळीसाठी १० हजार रुपये असे एकूण १५ लाख ७९ हजार ४०० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडला दिले. एवढेच नव्हे तर ही रक्कम दावा दाखल तारखेपासून ९ टक्के व्याजदराने अदा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. या खटल्यात ॲड. प्रितेशकुमार एस. जैन यांनी प्रभावीपणे तक्रारदाराची बाजू मांडली.



