प्रकाशात भीषण दुर्घटना : भरधाव ट्रकने वृद्धेला चिरडले; उपचार सुरू असताना झाला मृत्यू
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ६५ वर्षीय वृद्ध महिलेला चिरडल्याची भीषण दुर्घटना शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे घडली. जयाबाई मोहन भोई असे या महिलेचे नाव असून, या प्रकरणी संबंधित ट्रकच्या अज्ञात चालकाच्या विरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयाबाई मोहन भोई (६५, रा. प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार) या गावातील एका कृषी उद्योग दुकानासमोरून रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्याचवेळी मागील बाजूने भरधाव वेगात येणार्या ट्रकच्या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून जयाबाई यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये जयाबाई भोई गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांसह नातेवाईकांनी त्यांना तातडीने प्रकाशा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जीवन मोहन भोई यांनी संबंधित ट्रकचालकाच्या (नाव, गाव, पत्ता माहिती नाही) विरोधात रितसर फिर्याद दाखल केली. त्यावरून त्या अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



