नंदुरबार जिल्हा

फक्‍त शहादा, नंदुरबार तालुक्‍याची भूजल पातळी वाढली, इतर तालुक्‍यांत मात्र विहिरी तळाला; पाणी जपून वापरावे लागणार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उन्‍हाळ्‍याची चाहूल लागली असतानाच राज्‍यातील धरणांत ६४ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा शिल्‍लक असल्‍याचे समोर आले आहे. त्‍याचवेळी अतिशय दुर्गम जिल्‍हा असलेल्‍या नंदुरबारच्‍या ग्रामीण भागात भुजल पातळीत ०.२१ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्‍यात आली आहे. असे असले तरी ही सरासरी केवळ शहादा व नंदुरबार या दोन तालुक्‍यांतील भूजल पातळीत वाढ झाल्‍याने नोंदविण्‍यात आली असून, जिल्‍ह्याच्‍या इतर तालुक्‍यांत मात्र पाणीपातळीत घटच झाल्‍याचे दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यातील निरीक्षण विहिरींच्‍या पाहणीतून तयार करण्‍यात आलेल्‍या गेल्‍या पाच वर्षांच्‍या भूजल पातळीचा तुलनात्‍मक अहवाल जाहीर झाला आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यातील सरासरी भूजल पातळी ०.२१ टक्‍क्‍यांनी वाढल्‍याचे म्‍हटले आहे. जिल्‍ह्याची गेल्‍या पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळी ४.२५ टक्‍के होती. ती जानेवारी २०२६ मध्‍ये ४.०४ टक्‍के नोंदविण्‍यात आली आहे. यामध्‍ये सर्वांत मोठा वाटा शहादा तालुक्‍याचा आहे. या तालुक्‍याची गेल्‍या पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ५.७५ टक्‍के होती. ती जानेवारी २०२६ मध्‍ये १.२७ मीटरने वाढून ४.४८ मीटरवर आली आहे. नंदुरबार तालुक्‍यातही सरासरी ४.६१ मीटर असलेली भूजल पातळी ०.८७ मीटरने वाढून आता ३.७४ मीटरवर पोहोचली आहे.
इतर तालुक्‍यांत विदारक चित्र
शहादा व नंदुरबार तालुक्‍यांत भूजल पातळी वाढल्‍याने साहजिकच जिल्‍ह्याची सरासरी वाढली आहे. त्‍याचवेळी जिल्‍ह्याच्‍या इतर चार तालुक्‍यांत मात्र भूजल पातळीच्‍या बाबतीत अजूनही विदारक चित्र असल्‍याचे समोर आले आहे. अक्राणी तालुक्‍यात सरासरी २.३३ मीटर भूजल पातळीच्‍या तुलनेत यंदा ही पातळी २.६५ मीटरवर पोहोचली असून, ही घट ०.३२ टक्के आहे. नवापूर तालुक्‍यातही ०.५१ टक्‍क्‍यांच्‍या घसरणीसह भूजल पातळी ३.१३ मीटरवरून ३.६४ मीटरवर पोहोचली आहे. या दोन तालुक्‍यांच्‍या तुलनेत अक्कलकुवा व तळोदा या तालुक्‍यांच्‍या भूजल पातळीत झालेली घट काही अंशी कमी आहे. अक्‍कलकुवा तालुक्‍यात ३.९४ मीटर सरासरीच्‍या तुलनेत भूजल पातळी ०.३ मीटरच्‍या घटीसह ३.९७ मीटरवर गेली आहे. तर तळोदा तालुक्‍यात ही घट ०.२ टक्‍के इतकी नाममात्र आहे. या तालुक्‍याची सरासरी भूजल पातळी ५.७७ टक्‍के होती. ती आता ५.७५ टक्‍क्‍यांवर आली आहे.
दरम्‍यान, शहादा व नंदुरबार या दोन तालुक्‍यांच्‍या भूजल पातळीतील वाढ मोठी असल्‍याने त्‍याचा परिणाम म्‍हणून साहजिकच जिल्‍ह्याची सरासरी वाढल्‍याचे दिसत आहे. त्‍याचवेळी भूजल पातळी आणखी खाली जावू नये यासाठी पाण्‍याच्‍या जपून वापरासह जलसंधारणाच्‍या उपाययोजना राबविणे आणि पावसाचे पाणी साठवण्‍यावर भर द्यावा लागेल, असे नंदुरबारच्‍या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील वरिष्‍ठ भूवैज्ञानिक डॉ. सुजित शिंपी यांनी म्‍हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button