लाडक्या बहिणींनो सावधान : इ केवायसी प्रक्रियेतील चूक सुधारण्यासाठी उरले फक्त २५ दिवस, अन्यथा करावा लागेल पश्चाताप
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात चूक झालेल्या लाभार्थी महिलांना आता आपली चूक सुधारण्यासाठी केवळ २५ दिवसांचा कालावधी उरला आहे. कारण राज्य सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या महिलांना ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणार्या महिलांना पुन्हा मुदत मिळणार नसल्याने त्यांच्यावर दरमहा मिळणार्या १५०० रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने आपल्या खात्यांची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी याआधी ३१ डिसेंबर २०२५ या तारखेपर्यंत मुदत दिली होती. त्यावेळी बहुतांश महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, अनेक महिलांकडून ही प्रक्रिया पूर्ण करताना कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक (उदा. सरकारी, निमसरकारी, कंत्राटी, खासगी किंवा सरकारी निवृत्तीवेतनधारक) माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला होता. अशा महिलांना आता राज्य सरकारने योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावून झालेली चूक सुधारण्याची संधी दिली आहे. यासाठी सरकारने या लाभार्थी महिलांना ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांनी या मुदतीत आपली माहिती सुधारून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे. यापुढे यासाठीची मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने परिपत्रकात स्पष्ट केले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.



