कोंडाईबारी घाटात तीन ट्रकचा विचित्र अपघात; धडक देणार्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग; चालक गंभीर जखमी

विसरवाडी / नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात शुक्रवारी (दि.६) तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला. दहिवेलकडून विसरवाडीकडे येणार्या ट्रकने ब्रेक फेल झाल्याने समोर चालणार्या दोन ट्रकना मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत धडक देणार्या ट्रकचे अपघातानंतर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झाले. या आगीत ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएन ५२ यू ९४७९ क्रमांकाचा ट्रक दहिवेल येथून विसरवाडीच्या दिशेने येत होता. हा ट्रक पुढे गुजरातेतील बडोदाकडे पेपरचे गठ्ठे घेऊन जात होता. भरधाव वेगात चाललेल्या या ट्रकचे कोंडाईबारी घाटात उतारावर ब्रेक निकामी झाले. यामुळे या ट्रकने त्याच्यापुढे चाललेल्या दुधाच्या टँकरला (क्र. जीचे ०२ एटी ५५३५) मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे चाललेल्या आणखी एका ट्रकवर (क्र. टीएन ५२ डी २३६८) वर जावून आदळला.
या अपघातात ट्रकच्या केबिनचा पुढील भाग पूर्णपणे दाबला जाऊन चक्काचूर झाला. त्यामध्ये ट्रक चालक अडकून पडल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली तसेच हात-पायाला जबर जघमा झाल्या. त्यातच काही क्षणातच अपघातानंतर शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकला आग लागली आणि क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक व शेतकरी तातडीने मदतीला धावून आले. शेतातील पाईपच्या साहाय्याने पाणी आणून तसेच मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडीचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस पथक तसेच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशमन पथकाच्या प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.



