विसरवाडीत आगीचे तांडव : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कृषी केंद्राचे स्टोअर रूम खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात शुक्रवारी भल्या पहाटे आगीने तांडवनृत्य केले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या भीषण आगीत बाळू साळुंखे यांच्या घरातील त्यांच्याच मालकीच्या कृषी केंद्राचे स्टोअर रूम भस्मसात झाले. आगीत साळुंखे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी मात्र टळली आहे.
विसरवाडीत बाळू साळुंखे यांचे सोनई कृषी केंद्र या नावाने कृषी साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांनी या दुकानाचे साहित्य उत्तमनगर भागातील सोनई निवास या घरातील तळमजल्यावर केलेल्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले होते. शुक्रवारी (दि.६) भल्या पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास या स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत स्टोअर रूममधील फ्रिज, इन्व्हर्टर, बॅटरी, मिक्सर, लॅपटॉप, प्रिंटर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. एवढेच नव्हे तर याच खोलीत ठेवलेली साळुंखे कुटुंबाची तसेच व्यवसायाशी निगडीत सर्व महत्त्वाची कागदपत्रे देखील भस्मसात झाली. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आयकराशी निगडीत कागदपत्रे आदींचा समावेश आहे.
बाळू साळुंखे यांची दोन्ही मुले सुनील व अनिल साळुंखे हे दोघे वरील मजल्यावर झोपलेले होते. अचानक काहीतरी जळाल्याचा वास आणि धूर जाणवल्याने तत्काळ खाली धाव घेतली. स्टोअर रूममध्ये आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत सर्वप्रथम घराचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर मागील खिडकीचे काच फोडून बाहेरून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परिसरात होणार्या आवाजामुळे आणि आगीमुळे शेजार्यांनीही तातडीने तिकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग मोठ्या प्रमाणात असल्याने घरातील इतर वस्तूही तिच्या तावडीत सापडल्या आणि मोठे नुकसान झाले. आगीमुळे घरातील भिंती व रंग पूर्णपणे काळवंडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेची माहिती महावितरणच्या विद्युत उपकेंद्राला तसेच विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या आगीत प्रचंड आर्थिक नुकसान झाले असले तरी साळुंखे कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.



