नंदुरबार जिल्हा

नंदुरबारकर शेतकर्‍यांची कर्जमाफी १०० कोटींची; साडेसात हजार जणांना होणार फायदा, ५० हजारांच्‍या लाभार्थ्यांचा आकडा लवकरच येणार समोर

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍यातील शेतकर्‍यांसाठी घोषित करण्‍यात आलेल्‍या कर्जमाफीचा फायदा नंदुरबार जिल्‍ह्यातील तब्‍बल ७ हजार ५०० हून अधिक शेतकर्‍यांना होणार आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्‍या या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्‍ह्यातील पात्र शेतकर्‍यांचे तब्‍बल शंभर कोटींहून अधिक़ रुपयांचे कर्ज माफ होणार असल्‍याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय कृषीकर्जाची नियमित फेड करणार्‍यांना ५० हजार रुपयांचा फायदा होणार असून, याच्‍या जिल्‍ह्यातील लाभार्थ्यांचा आकडा मात्र अजून समोर येणे बाकी आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबार जिल्‍ह्यात १२ राष्‍ट्रीयीकृत, तीन खासगी, दोन ग्रामीण आणि एक मध्‍यवर्ती सहकारी बँक आहे. त्‍यांच्‍याकडून जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना पीककर्जाचा पुरवठा केला जातो. यापैकी केवळ नंदुरबार जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेल्‍या शेतकर्‍यांपैकी सुमारे ६ हजार ५६९ खातेदार कर्जदार असून, त्‍यांच्‍याकडे ८९ कोटी ९२ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकित आहे. आता राज्‍य सरकारने जाहीर केलेल्‍या कर्जमाफी अंतर्गत हे सर्व कर्ज माफ होणार आहे. एवढेच नव्‍हे तर अन्‍य सुमारे एक हजारहून अधिक शेतकर्‍यांनी राष्‍ट्रीयीकृत व अन्‍य बँकांकडून पीककर्ज घेतले असून, हा आकडा दहा कोटींच्‍या घरात असण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, एकंदरीत या योजनेचा फायदा होणार असलेल्‍या शेतकर्‍यांची संख्‍या ७ हजार ५०० हून अधिक असल्‍याचे सांगण्‍यात येते.
दरम्‍यान, जिल्‍ह्यात ३१ मार्च २०२५ च्‍या अखेरीस ६२ हजार १३४ शेतकर्‍यांनी त्‍यांच्‍याकडे थकित असलेल्‍या पीककर्जाच्‍या रकमेचा भरणा केला नव्‍हता. त्‍यामुळे त्‍यांची खाती एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) झाली आहेत. परिणामी त्‍यांना २०२५ – २६ या आर्थिक वर्षात बँकांकडून कर्जाचा पुरवठा करण्‍यात आला नव्‍हता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button