नंदुरबारच्या हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनो काळजी सोडा; कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध; एजन्सीधारक म्हणाले…
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. यामुळे नंदुरबार हॉटेल, रेस्टॉरंट चालकांच्या मनात धडकी भरली असली तरी त्यांना दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. नंदुरबार शहर व जिल्ह्यात तूर्तास व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, त्यांना सध्याच काही चिंता करण्याची गरज नसल्याचे शहरातील गॅस एजन्सीधारकांनी ‘नंदुरबार पोस्ट’कडे स्पष्ट केले आहे.
आखाती देशांत युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योगांना व्यावसायिक वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर पुरवण्यावर बंदी घालताना या एलपीजी गॅसचा पुरवठा आता केवळ घरगुती वापरासाठीच केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. हॉटेल व रेस्टॉरंट चालकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात चार गॅस एजन्सी (तीन एचपी व एक इंडेन) आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना महिन्याकाठी सुमारे २५०० हून अधिक व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. केंद्र सरकारच्या बंदीच्या निर्णयानंतर साहजिकच नंदुरबार शहर व जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांचना धडकी भरली असून, ‘आता धंदा बंद करावा लागणार की काय’ अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘नंदुरबार पोस्ट’ने शहरातील गॅस एजन्सीधारकांशी संपर्क साधला असता त्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना दिलासा देणारी माहिती दिली. सध्या शहरातील सर्वच गॅस एजन्सींकडे व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे या गॅस एजन्सीधारकांनी सांगितले.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंटधारकांना पुरवू नयेत, अशी सूचना अजून तरी कंपनीकडून आम्हाला आलेली नाही. सध्या आमच्याकडे कमर्शिअल सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
– दीपक शिंदे (कल्याणी इंडेन गॅस एजन्सी, नंदुरबार)
———————————————————————————————————— गॅस पुरवठ्याबाबत हॉटेल व्यावसायिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण सिलिंडर पुरवठा थांबवण्याच्या अनुषंगाने अद्याप आम्हाला कंपनीकडून काहीही कळविण्यात आलेले नाही. सध्या या व्यावसायिकांना मागणीनुसार सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत.
– हिरेनभाई चलियावाला (नंदुरबार गॅस कंपनी, नंदुरबार)



