तळोदा तालुक्यात जमिनीच्या तुकड्यावरून सख्खे भाऊ भिडले; एकाने कोयत्याने केले डोक्यात वार, दुसर्याने पुतण्याला झोडपले
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’, या उक्तीवर नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने पुन्हा शिक्कामोर्तब केले. तळोदा तालुक्यात मोहिदा येथील उमरी शिवारात सख्ख्या भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरून तुफान हाणामारी झाली. यात दोन भावांनी तिसर्यासह त्याच्या कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी तिघांविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी गावाच्या शिवारात शेती असलेल्या चव्हाण कुटुंबियांमध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद होता. याच अनुषंगाने रमण सुपा चव्हाण व गिरधर सुपा चव्हाण या दोन भावांमध्ये पुन्हा याच मुद्यावर बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. रमण याने लोखंडी कोयता काढून गिरधर याच्या डोक्यात वार करीत त्याला गंभीर दुखापत केली. त्याचवेळी रमण याचा मुलगा भूषण चव्हाण हा गिरधर यांना लाकडी काठीने मारहाण करीत होता. दुसरीकडे, बाजूलाच दुसरा भाऊ वंकर सुपा चव्हाण याने गिरधर चव्हाण याचा मुलगा गणेश याच्यावर हल्ला चढवत त्याला बांबूने मारहाण करीत जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
अखेर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे गिरधर चव्हाण याने रमण व वंकर या दोन्ही भावांसह पुतण्या भूषण रमण चव्हाण या तिघांविरोधात रितसर फिर्याद दिली. त्यावरून या तिघांच्या विरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक भीमसिंग ठाकरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



