नंदुरबार जिल्हा

धडगाव पोलिस निरीक्षकांविरोधात महिलेचे ‘उपोषणास्‍त्र’; पो.नि. जगताप म्‍हणाले, तो त्‍यांचा अधिकार, चौकशीत सत्‍य बाहेर येईल

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तीन महिन्‍यांपूर्वी दाखल केलेल्‍या तक्रारीचा योग्‍य तपास न केल्‍याचा आरोप करीत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्‍याविरोधात ११ मार्चपासून उपोषण करण्‍याचा इशारा सविता विजय वसावे या महिलेने दिल्‍याने खळबळ उडाली आहे. जगताप यांनी मात्र उपोषण वैयक्‍तिक अधिकार असल्‍याचे सांगून चौकशी झाल्‍यास सत्‍य बाहेर येईलच, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्‍या सविता वसावे यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी एका महिलेसह इतर सहा जणांविरोधात धडगाव पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. त्‍यावरून संबंधितांविरोधात खंडणी, सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायद्यान्‍वये गुन्हा करण्यात आला आहे. मात्र, पोलिस निरीक्षक जगताप व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी संशयित आरोपींना वाचवण्‍यासाठी सदरच्या गुन्ह्यात अनेक महत्त्‍वाच्‍या कलमांचा समावेश केला नाही. तीन महिने उलटूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाहीत. फिर्यादीसह न्‍यायालयाची देखील त्‍यांनी फसवणूक केली आहे. पोलिस अधीक्षक व शहादा उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना यासंदर्भात निवेदन देवूनही त्‍यांनी जगताप यांच्‍यावर कारवाई केली नाही. असे आरोप वसावे यांनी केले आहेत. या संदर्भात आता वसावे यांनी बिरसा फायटर्स, बिरसा आर्मीसह जिल्यातील आदिवासी संघटनांना या संदर्भात पत्र देऊन मदतीची मागणी केली असून, याच निवेदनात ११ मार्चपासून धडगाव पोलिस ठाण्‍यासमोर उपोषणास बसणार असल्‍याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.
दरम्‍यान, या संदर्भात ‘नंदुरबार पोस्‍ट’ने पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, तीन महिन्‍यांपूर्वी संबंधित महिलेच्‍या तक्रारीवरून संबंधितांवर कायद्याच्‍या योग्‍य कलमांनुसार गुन्‍हा दाखल करून त्‍यांना अटक करण्‍यात आली होती. मात्र, सर्व कारवाईवर तक्रारदाराचे समाधान होणार नसेल, तर त्‍याला इलाज नाही. आता तक्रारदार उपोषण करणार असतील तर तो त्‍यांचा अधिकार आहे. या अनुषंगाने चौकशी झाल्‍यास त्‍यातून जे सत्‍य आहे, ते सर्वांसमोर येईल. याशिवाय या विषयावर आपण अधिक बोलू शकत नाही.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button