अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी, गुंडागर्दी करीत मुंबई पालिकेच्या पथकावर हल्लाबोल, पळवून पळवून मारले

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अनधिकृत फेरीवाल्यांनी छत्रपती संभाजीनगरात गर्भवती महिलेला मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत अनधिकृत फेरीवाले थेट मुंबई महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांवर तुटून पडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून, त्यात हे फेरीवाले चक्क पालिका अधिकारी व कर्मचार्यांच्या मागे पळून त्यांच्यावर हल्ला करीत असल्याचे दिसत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवर संताप व्यक्त करतानाच हल्ला करणार्यांमध्ये काही बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांचे पथक शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कांदिवलीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. हे पथक कारवाईच्या स्थळी पोहोचून कारवाई करीत असतानाच एक जमाव त्यांच्यावर चाल करून आला. जमावातील काहींनी थेट पालिकेच्या अधिकार व कर्मचार्यांना थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. मोठा जमाव अंगावर येत असल्याचे पाहून अखेर त्या पथकाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. मात्र, जमावाने पाठलाग करून त्यांना मारहाण करणे सुरूच ठेवले होते, असे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते.
अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा काल विधानसभेत गाजत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेत महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी १२ ते १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नंतर त्यातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. दयम्यान, पालिकेच्या कर्मचार्यांवर हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असे बजावतानाच हल्लेखोर क्रांतीनगरमध्ये राहणार्या काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.



