नंदुरबार जिल्हा

नवापुरच्‍या खांडबारा रेल्‍वेस्‍थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा, तरुण बसला रेल्वेच्या डब्यावर चढून अन् मग उडाली सर्वांचीच धावपळ, नेमकं काय झालं, वाचा…

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री उशीरा सुमारे तासभर हाय होल्‍टेज ड्रामा रंगला. एका तरुणाने रेल्वेच्या डब्यावर चढून अतिउच्‍च दाबाच्‍या वायरजवळ धिंगाणा घातल्‍याने तेथे उपस्‍थित सर्वांचीच धावपळ उडाली. या सगळ्‍या प्रकारामुळे स्थानकावरील रेल्‍वेच्‍या अधिकारी कर्मचार्‍यांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे तासभर समजूत काढल्‍यानंतर या तरुणाला खाली उतरवण्‍यात आल्‍यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. मात्र, या सगळ्‍यात बराच वेळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहा वाजेच्‍या सुमारास एक तरुण अचानक भुसावळ–सुरत रेल्वे मार्गावरील खांडबारा रेल्वे स्थानकात उभ्‍या असलेल्‍या पॅसेंजर गाडीच्या डब्‍याच्‍या टपावर चढला. यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्‍या तरुणाने डब्याच्या छतावर गेल्यानंतर धावपळ करायला सुरूवात केली. एवढेच नाही तर तो पळत रेल्वेच्या वरून जाणाऱ्या सुमारे २५ हजार व्होल्ट क्षमतेच्या जिवंत विद्युत तारांच्‍या अगदी जवळ गेला. यामुळे अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाल्‍याने त्‍या भीतीने उपस्‍थित सगळ्‍यांचाच जीव खालीवर झाला.
घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्या मार्गावरील विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी खाली उतरवण्यासाठी त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो कोणाचेही काहीही ऐकूण घेत नव्‍हता. सुमारे एक तास कसोशीने प्रयत्‍न केल्‍यानंतर अखेर तो तरुण डब्‍यावरून खाली उतरण्‍यास तयार झाला. त्‍याला सुखरूप खाली उतरवल्‍यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
दरम्यान, या तरुणाची चौकशी करण्‍याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. त्‍याची ओळख तसेच त्‍याने हे कृत्‍य नेमके का केले, हे उशीरापर्यंत जाहीर करण्‍यात आले नव्‍हते. रेल्‍वे प्रशासन या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button