नंदुरबार जिल्हा

नवापूरने गाठला डिजिटल परिवर्तनाचा महत्त्‍वाचा टप्‍पा; ढोरपाडा ठरले ‘पहिले ऑनलाइन रेशनकार्ड गाव’

विसरवाडी ता. नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यात डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, तालुक्यातील पहिले “ऑनलाईन रेशन कार्ड गाव” म्हणून घोषित होण्‍याचा मान ढोरपाडा गावाला मिळाला आहे. या उपक्रमामुळे शिधापत्रिका धारकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” अंतर्गत नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे मंडळस्तरीय शिबिर अग्रवाल भवन, विसरवाडी येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात सामान्य नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. महसूल प्रशासनासोबतच आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.
शिबिरात स्‍थानिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्‍यात सातबारा उतारे, ८अ खाते उतारे, ड पत्रक, उत्पन्न दाखले, शिधापत्रिकेत नवीन नावे समाविष्ट करणे, शिधापत्रिकेतून नावे कमी करणे, मयत वारस नोंदी, आधार कार्ड दुरुस्ती व नवीन नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचे मंजूर आदेश, नवीन अर्ज स्वीकृती तसेच कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश मावची, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित, नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित, मंडळातील सर्व ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी, भाजप महामंत्री सदस्य संदीप अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य शैलेश वसावे, नायब तहसीलदार शेखर मोरे, प्रवीण मराठे, भक्तराज सोनवणे, मंडळातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन विसरवाडी मंडळाचे मंडळ अधिकारी विलास चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी अशोक कोकणी, महेश गावित, अतुल पवार, निलेश मराठे, सुधाकर पवार, प्रीती वसावे, रविकिरण गांगुर्डे तसेच मंडळातील महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button