गुन्हे वार्ता

नंदुरबारच्‍या कंढरेत दोन कुटुंब भिडले; काकाची जमीन नावावर करण्‍यावरून हाणामारी; लाठ्याकाठ्या, फायटर, फावड्याने परस्‍परांवर वार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : काकांची जमीन परस्‍पर नावावर करून घेतल्‍याच्‍या मुद्यावरून दोन कुटुंबांमध्‍ये तुफान हाणामारी झाल्‍याची घटना नंदुरबार तालुक्‍यातील कंढरे गावात घडली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, दोन्‍ही कुटुंबांनी परस्‍परांना मारहाण करताना लाठ्याकाठ्या, मिरची पावडर, लोखंडी फायटर आणि फावड्याचा सर्रास वापर केला. या प्रकरणात परस्‍परविरोधी तक्रारीवरून एकूण ९ जणांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काकांची जमीन परस्‍पर मुलाच्‍या नावावर कशी करून घेतली, असा जाब विचारत हेमंत अर्जुन पाटील व त्‍यांच्‍या कुटुंबियांनी आपल्‍यासह पत्‍नी व मुलावर शस्‍त्रास्‍त्रांसह हल्‍ला केल्‍याची फिर्याद संजय भुरा पाटील (५२, रा. कंढरे, ता. व जि. नंदुरबार) यांनी दाखल केली. संशयित आरोपींनी फिर्यादी, त्‍यांची पत्‍नी रंजना संजय पाटील व मुलगा रोहित पाटील यांना लाथाबुक्‍क्‍यांनी तसेच काठीने मारहाण करीत जीवे मारण्‍याची धमकी दिली. आरोपींपैकी एकाने रंजना पाटील यांच्‍या डोक्‍यात फावड्याने वार केले, असे संजय पाटील यांच्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे. यावरून हेमंत अर्जुन पाटील, पारस अर्जुन पाटील, शाम एकनाथ पाटील, समाधान सुरेश पाटील, कुसुम सुरेश पाटील व सुमन एकनाथ पाटील (सर्व रा. कंढरे, ता. व जि. नंदुरबार) या सहा जणांविरोधात विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धनराज जाधव करीत आहेत.
तर हेमंत पाटील यांनीही संजय भुरा पाटील, रंजना संजय पाटील व रोहित संजय पाटील या तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. काकांची जमीन परस्‍पर नावावर कशी करून घेतली, याचा जाब विचारल्‍याच्‍या रागातून या तिघांनी फिर्यादी व त्‍यांच्‍या काकू सुमन सुरेश पाटील यांना लाथाबुक्‍क्‍यांसह फायटरने मारहाण केली. तसेच रंजना पाटील यांनी सुमन पाटील यांच्‍या डोळ्‍यात मिरची पावडरही फेकली. या मारहाणीमुळे फिर्यादी व सुमन पाटील हे दोघे जखमी झाल्‍याचे या फिर्यादीत म्‍हटले आहे. यावरून वरील तिघांविरोधात विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करून त्‍याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मोतीराम बागुल करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button