दुसरे, तिसरे मूल जन्मल्यास मिळणार २५ हजार; मुलांना १८ व्या वर्षापर्यंत शिक्षण फुकट; आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बेधडक घोषणा

हैदराबाद (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘हम दो, हमारे दो’च्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असतानाच आंध्र प्रदेशात मात्र यापुढे दुसरे किंवा तिसरे मूल जन्माला घालणार्या जोडप्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्य विधानसभेत तशी घोषणाच केली आहे.
लोकसंख्या नियंत्रण कायद्याऐवजी नायडू यांच्या नेतृत्त्वाखालील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सरकार लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. याअंतर्गत दुसरे किंवा तिसरे मूल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याबरोबरच तिसर्या मुलाला वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत दरमहा एक हजार रुपये पोषण आहार भत्ता आणि सर्व मुलांना वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्यातील घटती प्रजनन क्षमता, वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि संसदेतील दक्षिण भारताचे कमी होत असलेले प्रतिनिधित्व या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याचे नायडू यांनी सांगितले.
“सध्या, सुमारे ५८% कुटुंबांना फक्त एक मूल आहे, सुमारे २.१७ लाख कुटुंबांना दोन मुले आहेत आणि जवळजवळ ६२ लाख कुटुंबांना तीन किंवा त्याहून अधिक मुले आहेत,” असे त्यांनी विधानसभेत सांगितले. आपली लोकसंख्या व्यवस्थापन योजना लोकसंख्या वाढवण्यासाठी एक गेम चेंजर असेल, असा विश्वासही नायडू यांनी यावेळी व्यक्त केला.

