शहाद्यात नगरसेवकांची निवडणुकीची झिंग उतरेना; परस्पर वादातून न.प.चा कोट्यवधींचा निधी परत जाण्याची शक्यता, शिवसेनेच्या आरोपाने खळबळ

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा नगरपालिकेची निवडणूक पार पडून सुमारे दोन महिने उलटले असले तरी निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणुकीतील झिंग अजून उतरायला तयार नाही. नगर परिषदेचे पदाधिकारी अजूनही राजकीय हेव्यादाव्यांमध्येच गुरफटून गेले असून, त्यामुळे शहरा तील विकासकामांना वेग मिळालेला नाही. यातूनच नगर परिषदेला शासनाकडून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) केला आहे.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहादा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली होती. त्या सभेत मंजूर, स्थगित किंवा नामंजूर झालेल्या विषयांची अधिकृत माहिती नागरिकांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, आजपर्यंत या बाबतची स्पष्ट माहिती शहरवासीयांपर्यंत पोहोचलेली नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. नगरपालिकेतील पदाधिकार्यांमधील राजकीय मतभेदांमुळे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मिळालेला सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच खासदार अॅड. गोवाल पाडवी यांनी आवश्यक भौतिक सुविधांसाठी सुचविलेला सुमारे १० लाख रुपयांचा निधी देखील खर्च न झाल्यास शासनाकडे परत जाऊ शकतो, असे शिवसेनेचे शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायस्वाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
इतर विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधीही खर्च न झाल्यास शासनाकडे परत जाण्याची शक्यता असल्याने ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी शहरवासीयांसमोर वास्तव परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरवासीयांच्या उज्ज्वल भविष्यासह त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जात, धर्म किंवा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जायसवाल यांनी केले आहे. शहराच्या विकासाला जनहिताला बाधा आणणारे निर्णय झाल्यास शिवसेना जनतेसोबत आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
