नंदुरबारच्या हॉटेलांना लागणार टाळे?; आजपासून गॅस पुरवठा होणार बंद, युद्धाचा फटका, २४ तासांतच चित्र बदलले
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायावर गंडांतर येऊ घातले आहे. केंद सरकारने घातलेल्या बंदीनंतर गॅस कंपन्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योगांना व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर देणे बंद केले असून, परिणामी हॉटेल, रेस्टॉरंटला टाळे ठोकण्याची वेळ या व्यावसायिकांवर येऊन ठेपली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस कंपन्यांना हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योगांचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवठा थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर गॅस कंपन्यांनी आपल्या एजन्सीधारकांना तशा सूचना जारी केल्या होत्या. मात्र, हे आदेश शनिवारी (दि.७) सकाळपर्यंत नंदुरबार शहरातील गॅस एजन्सीधारकांपर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे या एजन्सीधारकांनी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देताना या सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याने काळजी करू नका, असा दिलासा ‘नंदुरबार पोस्ट’शी बोलताना दिला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच हे चित्र पालटले. कारण, हॉटेलचालकांना व्यावसायिक एलपजी गॅस पुरवठा बंद करण्याचे गॅस पुरवठादार कंपन्यांचे आदेश शनिवारी संध्याकाळी नंदुरबारमध्ये धडकले. यानंतर आता शहरातील गॅस एजन्सीधारकांनी पुढील निर्णय होईपर्यंत शहर व जिल्ह्यातील हॉटेल्सना हे सिलिंडर न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आम्हाला मिळणारच नसेल तर आम्ही हॉटेल्स चालकांना ते कसे पुरवणार, असा सवाल नंदुरबार शहरातील एका गॅस एजन्सीधारकाने ‘नंदुरबार पोस्ट’शी बोलताना केला.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर न मिळणे हा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांसाठी मोठा धक्का मानला जात असून, गॅसच मिळणार नसेल तर व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर नियमित मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच् मानसिकता नंदुरबारमधील काही हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी करून ठेवल्याचे समजते. नंदुरबार शहरात चार गॅस एजन्सी (तीन एचपी व एक इंडेन) आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना महिन्याकाठी सुमारे २५०० हून अधिक व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, रविवारपासून (दि.८) हा पुरवठा पूर्णत: थांबणार आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंटधारकांना पुरवू नयेत, अशा सूचनेचा अधिकृत इ-मेल आम्हाला एचपी कंपनीकडून शनिवारी उशीरा प्राप्त झाला. या सूचनेचे तंतोतंत पालन केले जाईल. कंपनीने आम्हाला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर पाठवणे थांबवले असून, साहजिकच आम्हीही ही पुरवठा साखळी सुरळित होईपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना यापुढे हे सिलिंडर देऊ शकणार नाही.
– हिरेनभाई चलियावाला (नंदुरबार गॅस कंपनी, नंदुरबार)



