तळोद्यात पार पडला ‘ती’च्या कौतुकाचा सोहळा; ‘एस.ए. मिशन’ मध्ये महिला दिनानिमित्त माता पालक, आजींचा सत्कार
(नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महिला आई, मुलगी, बहिण, पत्नी, सखी, सासू या विविध भूमिकांतून कर्तव्य पार पाडून आपल्या जीवनाला आकार देतात. या प्रत्येक टप्प्यावर त्या आपल्या कर्मव्याचा ठसा उमटवतात. आपले आयुष्य महिलांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तव्याला सलाम करणे, आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन तळोदा येथील एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.७) शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता पालक व आजी यांच्या कौतुकाचा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेतील सर्व माहिला शिक्षिका व उपस्थित सर्व माता पालकांचे भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाईक म्हणाले, महिला साक्षीमीकरणनेच आपला भारत देश हा विकसित देश बनू शकतो. त्यांच्यामुळेच घराला घर पण येते. त्यांच्याकडूनच आपल्याला संस्काराची शिदोरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी महिलांच्या सन्मानात कधीही मागे राहू नये.
या वेळी हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी मुलींच्या जीवनात येणाऱ्या समस्येवर आधारित सुंदर नृत्य सादर केले तर स्वागत नृत्य आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी उपस्थित महिलांसाठी उखाणे स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ व संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय विजेत्या माता पालकांना मुखाध्यापक नाईक यांच्या हस्ते पारितोषिक म्हणून भेट वस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसा कलाल व मनिषा मगरे यांनी तर आभार प्रदर्शन मिल्क वळवी यांनी केले. यावेळी बालविवाहमुक्त भारत याची सर्व माता पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



