मुख्य बातम्या

बोंबला : आता महिन्‍यातून एकदाच मिळणार घरगुती गॅसचे सिलिंडर; केंद्राकडून खरेदीच्‍या नियमात मोठा बदल

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : घरगुती वापराच्‍या एलपीजी गॅस सिलिंडरच्‍या किमतीत वाढ झाल्‍यानंतर अवघ्‍या काही तासांतच केंद्र सरकारने आता या सिलिंडरच्‍या खरेदी नियमातही मोठा बदल केला आहे. ग्राहकांना व्‍यावसायिक आणि घरगुती वापराचे सिलिंडर महिन्‍यातून एकदाच देण्‍याचे निर्देश सरकारने गॅस वितरक कंपन्‍यांना दिले आहेत.
इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने यांनी पुकारलेल्‍या युद्धाचे थेट पडसाद भारतीयांच्या स्वयंपाक घरापर्यंत पडू लागले आहेत. आखातात पेटलेल्‍या युद्धामुळे मोठी गॅस टंचाई निर्माण झाली असून, ग्राहकांना होणार्‍या सिलिंडरच्‍या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने याआधीच हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट आणि उद्योगांना होणारा व्‍यावसायिक वापराच्‍या एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबविण्‍याचे आदेश गॅस वितरक कंपन्‍यांना दिले होते. त्‍या पाठोपाठ १४.२ किलोच्‍या घरगुती वापराच्‍या गॅस सिलिंडरच्‍या किमतीत सुमारे ६० रुपयांची तर व्‍यावसायिक वापराच्‍या गॅस सिलिंडडरच्‍या किमतीत ११४ रुपये ५० पैशांची वाढ करण्‍यात आली होती.
त्‍यानंतर आता आणखी एक धक्‍कादायक बातमी समोर आली आहे. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून २५ दिवसांचा करण्यात आला आहे, तसेच केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी याआधी त्‍यांना पहिले सिलिंडर घेतल्‍यानंतर दुसर्‍या सिलिंडरसाठी १५ दिवसांनी बुकिंग करता येत होते. मात्र, आता हा कालावधी वाढविण्‍यात आल्‍याने ग्राहकांना महिन्‍यातून एकच सिलिंडर मिळू शकणार आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button