शहाद्याच्या लंगडीभवानीत यापुढे बालविवाह बंद; गावकर्यांचा ग्रामसभेत एकमुखी निर्णय, महिला सरपंचांनी घेतला पुढाकार

शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बालविवाहासारख्या कुप्रथांना प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना बळ देताना शहादा तालुक्यातील लंगडीभवानीच्या गावकर्यांनीही यापुढे गावात बालविवाह होऊ देणार नाही, अशी शपथ घेत तसा ठरावच ग्रामसभेत मंजूर केला. सरपंच प्रीती नीलेश पावरा (सुळे) यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
प्रीती पावरा (सुळे) यांच्या अध्यक्षतेखाली लंगडीभवानी गावाची ग्रामसभा पार पडली. यावेळी २०२५ – २६ या आर्थिक वर्षात गावात झालेल्या कामांचा लेखाजोखा गावकर्यांपुढे मांडण्यात आला. तसेच आगामी वर्षासाठीचे नियोजनही त्यांच्यापुढे मांडण्यात आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या ग्रामसभेत विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.
अत्यंत अल्पवयात होणार्या मुला–मुलींच्या विवाहांमुळे त्यांच्या आयुष्यात आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. पुढील पिढी सुदृढ जन्मावी यासाठी बालविवाहांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असे सांगत यापुढे गावात बालविवाह रोखण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला गावकर्यांनी एकमुखाने मंजुरी दिली. सभेची प्रस्तावना आणि विषयांची मांडणी ग्रामपंचायत अधिकारी मुकेश जाधव यांनी केली.
या ग्रामसभेला उपसरपंच ताराचंद मोते, ग्रामसभा कोष समिती अध्यक्ष कमल पावरा, माजी सरपंच वसंत पावरा (सुळे), वन हक्क व वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश पावरा (सुळे), ग्रामपंचायत सदस्य चंपालाल पावरा, अनिता पावरा, रवींद्र डुडवे, शर्मिला पावरा, यशवंत पावरा, कल्पना ठाकरे, मुन्ना पावरा, माजी पंचायत समिती सदस्य विजय पावरा यांच्यासह लंगडीभवानी व गोटाळीपाडा येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



