नंदुरबार जिल्हा

कोंडाईबारा घाटात दुसर्‍या दिवशीही अपघात; ब्रेक फेल झालेला टँकर ट्रकवर आदळला, जीवितहानी टळली; प्रशासनाच्‍या ‘फार्स’वर लोकांचा संताप

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तीन ट्रकचा विचित्र अपघात होऊन चोवीस तासही उलटत नाही तोच नवापूर तालुक्‍यातील कोंडाईबारा घाटात पुन्‍हा एकदा अपघाताची घटना घडली. रासायनिक द्रव्‍य भरून अहमदाबादकडे निघालेल्‍या एका टँकरने ब्रेक फेल झाल्‍यामुळे समोर चाललेल्‍या ट्रकला जोरदार धडक दिल्‍याने हा भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी टँकरचे मोठे नुकसान झाले.
शुक्रवारी गुजरातकडे निघालेल्‍या एका ट्रकने ब्रेक फेल झाल्‍याने समोर चालत असलेल्‍या दोन ट्रकला जोरदार धडक दिली होती. या अपघातात धडक देणार्‍या ट्रकचा समोरील भाग शॉर्टसर्किटमुळे लागलेल्‍या आगीत भस्‍मसात झाला होता. तर चालकही गंभीर जखमी झाला होता. त्‍यानंतर अवघ्‍या २४ तासांनंतरच पैठणहून अहमदाबादकडे भरधाव निघालेल्‍या रासायनिक पदार्थ असलेल्‍या टँकर (क्र. जीजे १२ बीटी ३८१४) चा अपघात झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून या टँकरने समोर चालणार्‍या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. या धडक देणार्‍या टँकरचा समोरील भाग चक्‍काचूर झाला. या टँकरमध्‍ये रासायनिक पदार्थ असल्‍याने होते. त्‍याला फारसा धक्‍का न लागल्‍याने मोठी हानी टळली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तत्‍काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत केली.
उपाययोजनांची बोंबाबोंब
सलग दुसर्‍या दिवशी झालेल्‍या या अपघातामुळे कोंडाईबारी घाट पुन्हा एकदा चर्चेत आला असून, वारंवार अपघाताच्‍या घटना घडत असल्‍याने हा घाट अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्‍याची चर्चा सुरू आहे. या घाट मार्गावर गेल्‍या वर्षभरात तब्‍बल शंभराहून अधिक अपघात झाले आहेत. वाढत्‍या अपघाताच्‍या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गेल्‍या वर्षी या घाटमार्गाची पाहणी करून अपघाताचे हॉटस्‍पॉट निश्‍चित केले होते. मात्र, पुढे या ठिकाणांवर अपघात टाळण्‍याच्‍या अनुषंगाने काहीच उपाययोजना न करण्‍यात आल्‍याने प्रशासनाने केलेली पाहणी म्‍हणजे निव्‍वळ फार्स होता, असा आरोप आता होऊ लागला आहे. आता सलग दोन अपघातानंतर तरी प्रशासनाला या अनुषंगाने जाग येईल का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button