अक्कलकुव्याच्या भांगरापाणीत दारूच्या नशेत एकावर प्राणघातक हल्ला, तर भांडणात लेकाला साथ देत बापाने केली मारहाण
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कोणतेही कारण किंवा वाद नसताना एकाने दारूच्या नशेत ५५ वषींय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी (पाटीलपाडा) येथे घडली. या घटनेत चाकूचे वार करणार्या मुलाला वडिलांनीही साथ देत संबंधिताला मारहाण केली असून, या दोघांवरही मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेड्या करमसिंग वसावे (५५, रा. भांगरापाणी पाटीलवाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. टेड्या वसावे हे भल्या पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास गावात होळी उत्सवाच्या ठिकाणी सजावटीचे काम करीत असतानाच तुषार सोन्या वसावे व त्याचे वडिल सोन्या टेंबर्या वसावे (रा. भांगरापाणी पाटीलवाडा, ता. अक्कलकुवा) हे त्या ठिकाणी आले. यावेळी तुषार दारूच्या नशेत होता. कोणतेही कारण किंवा वाद नसताना त्याने अचानक टेड्या वसावे यांच्यावर धावून जात त्यांच्या कपाळावर उजव्या बाजूला चाकूने वार केला. याचवेळी सोन्या वसावे याने मुलाला साथ देत टेड्या वसावे यांना मारहाण केली. या घटनेत टेड्या वसावे हे जखमी झाले असून, त्यांनी नंतर मोलगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तुषार व सोन्या वसावे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ११८ (१), ३५१ (२), ३५२, ३ (५) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप चौरे करीत आहेत.



