कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले; आधी डोक्यात वार, मग गळा आवळला, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील कहाटुळ गावातील ६५ वर्षीय राणुबाई दुलब इशी या महिलेच्या मृत्यूचे रहस्य अखेर पोलिसांनी शोधून काढले आहे. राणुबाईचा गावातीलच ६५ वर्षीय व्यक्तीने खून केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सतत पैसे मागत असल्याने वैतागून डोक्यात वार करून आणि नंतर गळा आवळून राणुबाईला कायमचे संपविल्याची कबुली आरोपी भिला लोटन माळी याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कहाटुळ गावातील राणुबाई दुलब इशी ही ६५ वर्षीय महिला ८ फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता होती. ३ मार्च २०२६ रोजी धुलिवंदनाच्या दिवशी गावाला लागून असलेल्या छोटू पाटील यांच्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. राणुबाई यांचे भाऊ कृष्णा पवार यांनी राणुबाई यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून मृतदेहाची ओळख पटविली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता. राणुबाईचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीच्या विरोधात शहादा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला होता.
असा झाला गुन्हा उघड
खुनाची घटना घडल्याने पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून शहादा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी सीडीआर विश्लेषण व विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांनी दिलेल्या माहितीचा आधार घेत पोलिसांनी हा खून कहाटुळ गावातीलच भिका लोटन माळी (६५) याने केल्याचे उघड केले. खुन्याची ओळख पटताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केल्यावर त्याने सतत पैसे मागत असल्यानेच संतापातून राणुबाई इशी यांचा डोक्यात वार करून व गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
यांनी केला यशस्वी तपास
स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप वाघ, एलसीबीचे उपनिरीक्षक विकास गुंजाळ, शहादाचे उपनिरिक्षक विनोद पाटील, पोलिस हवालदार देविदास विसपुते, योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी, पोलिस शिपाई विकास शिरसाठ, भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी, कपिल मंदिल, एलसीबीचे पोलिस हवालदार जितेंद्र पाडवी, मोहन ढमढेरे, दादाभाई वाघ, मुकेश तावडे, सचिन वसावे, विशाल नागरे, पोलिस नाईक विकास कापुरे, पोलिस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.



