मोबदला न देताच ‘सुझलॉन’ने बळकावल्या जमिनी, तहसीलदारांच्या आदेशालाही खो, नंदुरबारच्या भडकलेल्या शेतकर्यांनी नाक दाबताच कंपनीने उघडले तोंड, म्हणे १५ दिवसांत पैसे देतो

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’ या उक्तीचा प्रत्यय नंदुरबारच्या शेतकर्यांनी सुझलॉन कंपनीच्या अधिकार्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवला. मोबदला न देता कंपनीने आपल्या शेतजमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत शेतकर्यांनी शुक्रवारी ‘सुझलॉन’च्या नंदुरबारस्थित मुख्य कार्यालयापुढे आंदोलन केले. अखेर शेतकर्यांच्या आक्रमकतेपुढे नमलेल्या कंपनीच्या अधिकार्यांनी शेवटी १५ दिवसांत मोबदल्याचे पैसे खात्यात जमा करण्याचे मान्य केल्याने शेतकर्यांनी १५ दिवसांसाठी आंदोलन मागे घेतले.
आदिवासी व मागासवर्गीय शेतकर्यांच्या जमिनी सुझलॉन कंपनीने अतिक्रमण करून त्यांच्या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व जमिनी ३६ व ३६ अ वर्गातील असून, एकतर कंपनीने हे अतिक्रमण हटवावे किंवा रेडीरेकनर दराने त्याचा मोबदला द्यावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. याचसाठी आधी शेतकर्यांनी नंदुरबार तहसीलदारांकडे तक्रारीही नोंदवल्या होत्या. त्याच्या सुनावणीत तहसीलदारांनी कंपनीला शेतकर्यांना मोबदला देण्याचे आदेश २४ जून २०२५ रोजी दिले होते. मात्र, कंपनीने हे आदेश डावलत शेतकर्यांना ९ महिने झुलवत ठेवले.
यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी अखेर शुक्रवारी (दि.१३) एकजूट करीत कंपनीच्या नंदुरबारमधील शनिमांडळस्थित सीएमएस कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकर्यांनी कंपनीचे सर्व टॉवर बंद करीत त्यांची कोंडी केली. आधी या विषयावर प्रतिक्रियाही न देणार्या कंपनीच्या अधिकार्यांना यावेळी मात्र शेतकर्यांच्या आक्रमकतेपुढे नमते घ्यावे लागले. ‘सुझलॉन’चे वरिष्ठ अधिकारी हितेश बडगुजर आणि अमित यादव यांनी शेतकरी व संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जमिनीचा मोबदला द्यायचे राहून गेल्याचे मान्य करीत शेतकर्यांना मोबदल्याचे पैसे १५ दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तूर्त या शेतकर्यांनी या १५ दिवसांसाठी स्थगित केले. दरम्यान, पुढील १५ दिवसांत बँक खात्यावर जमा न झाल्यास सिलीब्रिटींसह सर्वांचेच टॉवर कायमस्वरूपी बंद पाडण्यात येतील, असा इशारा यावेळी शेतकर्यांनी कंपनीच्या अधिकार्यांना दिला.
शेतकरी व संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, सचिव भिला भील, बापू भील, तानु भील, भीमराव सामुद्रे, अंबर ठाकरे, बळीराम भील, हिरामण भील, संजय भील, फुलाबाई भील, सनया भील, केवा भील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली राजन गावित, श्रीकांत पाटील यांनी शेतकरी व संघर्ष समितीचे पदाधिकारी व कंपनीचे अधिकारी यांची भेट घडवून आणत संवाद साधून दिला.



